देवळीत नेत्यांची मनधरणी; राजकारण तापले

09 Nov 2025 19:25:50
संतोष तुरक
देवळी, 
municipal-council-elections : देवळी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या आपल्या पक्षाच्या नेत्यांची मनधरणी सुरू केली असून सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे.
 

j k 
 
देवळी नगरपरिषदेत १८ हजार ६९६ लोकसंख्या आहे. त्यापैकी १६,४५८ मतदार असुन त्यात ८ हजार १६७ पुरुष तर ८ हजार २९१ महिला मतदार आहेत.
 
 
आ. राजेश बकाने आणि माजी खासदार रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपातर्फे प्रभागनिहाय उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष शोभा तडस आणि माजी उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर यांच्या नावांची चर्चा आहे.
 
 
काँग्रेसकडून माजी नगराध्यक्ष सुरेश वैद्य, माजी नगरसेवक हर्षवर्धन गोल्हर यांच्या नावांवर गंभीर विचार सुरू असून पक्षांतर्गत बैठकींनाही जोर आला आहे. प्रभाग निहाय उमेदवार ठरविण्याच्या प्रक्रियेने जोर पकडला आहे.
 
 
दरम्यान, युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांनी शिवसेना (शिंदे गट) सोबत हातमिळवणी करत जनशक्ती आघाडी स्थापन केली आहे.
 
 
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनीही उमेदवार निवडीची चाचपणी सुरू केली आहे. सर्व पक्षांनी मोहल्ला पातळीवर बैठका सुरू केल्या असून मतदारांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी कार्यकर्ते जनसंपर्क मोहिमेत व्यस्त आहेत.
 
 
नगरसेवक पदांसाठी इच्छुकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. प्रत्येक जण आपली निष्ठा, कार्य आणि जनसंपर्कावर आधारित पात्रता सांगत नेत्यांना मीच योग्य उमेदवार असल्याचे पटवून देण्याच्या प्रयत्नात आहे. वर्धेतील एका युवा नेत्याने येथील राजकारणात प्रवेश करीत एका पक्षाला पाठींबा देण्यासाठी स्वत:च पुढाकार घेतल्याची चर्चेनेही शहरात जोर पकडला आहे.
Powered By Sangraha 9.0