आलापल्ली/अहेरी,
devendra-fadnavis : सन 2010-2016 पासून प्रलंबित असलेले हे महत्त्वाचे काम आता पूर्ण झाले असून, त्यामुळे परिसरातील महिला आणि बालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेवटच्या माणसांपर्यंत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. अहेरी येथे महिला व बाल रुग्णालयाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व सामाजिक सक्षमीकरणाच्या दिशेने आजचा दिवस एक मैलाचा दगड ठरला. मागील 8-9 वर्षांपासून रखडलेले अहेरी येथील आधुनिक महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यासोबतच, जिल्ह्याचे चित्र बदलण्यासाठी आरोग्य योजनांचा विस्तार आणि महिला सक्षमीकरणाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करण्यात आली.
पुढे बोलतासना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, या रुग्णालयात सर्व प्रकारच्या प्रसूती सेवांसह बालकांसाठी एनआयसीयु (नवजात शिशु अतिदक्षता विभाग) सह सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. महिलांचे आणि कुपोषित बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी हे केंद्र केवळ अहेरीसाठीच नव्हे, तर आसपासच्या सर्व तालुक्यांना अत्यंत लाभदायक ठरणार आहे.
यावेळी व्यासपीठावर सह पालकमंत्री आशिष जयस्वाल, माजी राज्यमंत्री अंब्रिशराव आत्राम, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उप संचालक आरोग्यसेवा शशिकांत शंभरकर आणि माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी यांची उपस्थिती होती.
आरोग्य सेवेला अधिक व्यापक करण्यासाठी सरकारने ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनेत’ मोठे बदल केले आहेत. या योजनेत आता 1,376 उपचारांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार मिळणार आहे, ज्यामुळे गरीब आणि गरजू लोकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सिरोंचा येथे नव्याने उभारले जाणारे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देखील या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. यामुळे येथील नागरिकांना जागतिक दर्जाचे उपचार मोफत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली जिल्ह्याला केवळ ‘शेवटचा जिल्हा’ म्हणून न पाहता, महाराष्ट्राचे ‘प्रवेशद्वार’ म्हणून विकसित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
रोजगार आणि महिला सक्षमीकरण
बचत गटांना बळ देण्यासाठी ‘चक्रधर फंड योजना’ सुरू करण्यात आली, ज्याद्वारे महिलांना उद्योगांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा फंड दिला जाईल. या प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्यात 88 हजार महिला ’लखपती दीदी’ बनल्या आहेत. महिलांना स्वावलंबी करून त्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.
पर्यावरणाचा समतोल
जिल्ह्यात औद्योगिक क्रांती सुरू करताना पर्यावरणाचा समतोल राखण्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. कोट्यवधी झाडे लावण्याचा निर्णय घेतला गेला आहे, जेणेकरून गडचिरोली हा देशातील एक नंबरचा ‘हिरवा जिल्हा’ (ग्रीन डिस्ट्रिक्ट) बनेल. एकंदरीत, या आरोग्य लोकार्पण आणि सामाजिक-आर्थिक घोषणांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात आजचा दिवस एक ‘अमूल्य आणि मोठे’ परिवर्तन घडवणारा ठरला आहे.