संदीप राचर्लावार
सिरोंचा,
devendra-fadnavis : गडचिरोली जिल्ह्यातील सीमाभाग सिरोंचा येथे आज एक ऐतिहासिक क्षण घडला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड’ या बहुप्रतीक्षित प्रकल्पाच्या हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज आणि एज्युकेशनल कॅम्पसच्या पायाभरणी व कोनशिला अनावरणाचा समारंभ पार पडला.
हा उपक्रम फडणवीस यांच्या ‘विकसित गडचिरोली’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारा ठरत आहे. उद्योग, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राचा संगम घडवून आणणारा हा प्रकल्प म्हणजे सिरोंचा तालुक्याच्या विकासाचा नवा अध्याय आहे. या सोहळ्याप्रसंगी मंचावर गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री आशिष जयस्वाल, रुबी हॉस्पिटलचे संचालक राणा सूर्यवंशी, डायरेक्टर परवेज ग्लान्ट, गडचिरोलीच्या विभागीय आयुक्त विजय लक्ष्मी बेद्री, आमदार मिलिंद नरोटे, नांदेडचे आमदार डीएसपी संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, औद्योगिकीकरणानंतरही वृक्ष वाढू शकतात, तिथली हिवराई वाढू शकते आणि त्या भागात जैवविविधतेचा विकासही शक्य आहे. विकास म्हणजे केवळ कारखाने नव्हे, तर निसर्ग आणि प्रगती यांचा संतुलित संगम आहे. त्यांच्या या वक्तव्यातून सीमा भागातील विकास मॉडेलसाठी पर्यावरणपूरक धोरणाची झलक दिसली. त्यांनी स्पष्ट केले की, सिरोंचात उभारला जाणारा हा प्रकल्प केवळ आरोग्य आणि शिक्षणापुरता मर्यादित नसून, टिकाऊ विकासाचा आदर्श ठरेल.
या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारे 300 खाटांचे अत्याधुनिक हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज तसेच वेलनेस सेंटर या सर्व सुविधा एका कॅम्पसमध्ये असतील. सिरोंचात पुण्यातील रुबी हॉस्पिटलच्या तोडीस तोड सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या सर्व आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना उपचार मिळणार असून, सीमाभागातील नागरिकांना नागपूर किंवा हैद्राबादपर्यंत जावे लागणार नाही. या हॉस्पिटलमुळे दक्षिण गडचिरोली, तेलंगणा आणि छत्तीसगड सीमाभागातील हजारो लोकांना थेट लाभ होणार आहे.
या प्रकल्पात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसह आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 75 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन, आधुनिक ग्रंथालय आणि वस्तीगृह व्यवस्था उपलब्ध होणार आहे. सिरोंचाच्या युवकांसाठी हा प्रकल्प म्हणजे घरबसल्या प्रगतीचे दार ठरणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सिरोंचा हा महाराष्ट्राचा सीमाभाग असला तरी तो आता विकासाचा सीमोल्लंघन करणारा भाग बनत आहे. ‘विकसित गडचिरोली’ ही केवळ घोषणा नाही, तर ती आजच्या या भूमिपूजनाने प्रत्यक्ष साकार होते आहे. औद्योगिक प्रकल्प, आरोग्य सेवा, शिक्षण संस्था आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण या सर्व घटकांचा संगम म्हणजे ग्रामीण विकासाचे खरे चित्र आहे. सिरोंचात हा प्रयोग यशस्वी ठरल्यास तो ग्रामीण परिवर्तनाचा राष्ट्रीय मॉडेल ठरेल, असे ते म्हणाले.