नियोजन व अभ्यास हेच निवडणुकीतील यशाचे गमक : जिल्हाधिकारी कुंभेजकर

09 Nov 2025 19:36:53
वाशीम, 
yogesh-kumbhejkar : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे स्वरूप अधिक व्यापक आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाचे परिपत्रक आणि हँडबुक नीट वाचावे. विधानसभा लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील मूलभूत फरक लक्षात घ्यावा. इलेशन कमिशन ऑफ इंडिया राज्य निवडणूक आयोगाचे वेगवेगळे नियम आहेत जुन्या नियमांमध्ये आता बराचसा बदल झाला आहे.आतापासूनच सुक्ष्म नियोजन व अभ्यास करून निवडणूक यशस्वीपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.
 
 
k
 
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका/नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी मंगरूळनाथ आणि मालेगाव तालुयातील निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी ते बोलत होते. मंगरूळनाथ येथे झालेल्या बैठकीस अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त बी.डी. बिक्कड, तहसीलदार डॉ. मिलींद जगदाळे, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कोवे, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर, मुख्याधिकारी उमेश राठोड,नायब तहसीलदार रवी राठोड उपस्थित होते. मालेगाव येथील बैठकीस उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, उपविभागीय पोलिस अधिकारी नवदीप अग्रवाल ,तहसीलदार दीपक पुंडे, मुख्याधिकारी पंकज सोनोने उपस्थित होते.
 
 
 
जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, कार्यविभाजनाप्रमाणे प्रत्येक अधिकार्‍याने आपापल्या जबाबदार्‍या समजून घेतल्या पाहिजेत. झोननिहाय ईव्हीएम सिलींगचे कामकाज करावे लागणार असून वर्कलोड मोठा असणार आहे. त्यामुळे नोडल अधिकार्‍यांनी अधिनस्त कर्मचार्‍यांकडून जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करून घ्यावे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि अचूकता राखण्यासाठी नियोजनावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणासाठी कुशल मास्टर ट्रेनर्सची नेमणूक करण्यात याव्यात.सिंगल विंडोज कक्ष कार्यान्वित करावेत. मतदान केंद्रांवर पायाभूत सुविधा उपलब्ध असाव्यात, जेणेकरून मतदारांची गैरसोय होणार नाही. प्रशिक्षण अधिकारी यांनीच प्रशिक्षण घ्यावे. नोडल अधिकार्‍यांकडून चोख कामगिरी अपेक्षित आहे. मतदान केंद्रांवर मोबाईल डिपॉझिटची सोय व सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. वार्डनिहाय मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात करावी. मतदारांना बीयू व सीयू बाबत माहिती व्हावी यासाठी गणनिहाय जनजागृती करावी. दिव्यांग मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी सांगितले.
 
 
मंगरूळनाथ तालुयात एकूण ११० इमारतींमध्ये १४५ मतदान केंद्रे असून १ लाख १९ हजार ४६४ मतदार आहेत. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी ३ एसएसटी, ४ एफएसटी, ३ व्हीएसटी आणि १ व्हीव्हीटी पथक स्थापन करण्यात येणार असून ६५६ मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. नगरपंचायत मालेगाव सार्वत्रिक निवडणूक करिता ८ इमारतीमध्ये २४ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. १० एसएसटी, ४ एफएसटी , १ व्हीव्हीटी पथक स्थापन करण्यात आले असून २४ मतदान केंद्र, एकूण १२५ अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान दोन्ही ठिकाणी कामकाज नियोजनाची पाहणी सुध्दा जिल्हाधिकार्‍यांनी केली. बैठकीला जिल्हास्तरीय नोडल अधिकारी, झोनल अधिकारी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0