आता रानडुकरांमुळे शेतकरी अडचणीत

09 Nov 2025 20:33:15
सिंदी (रेल्वे), 
wild-boars : या वर्षी खरीप हंगामातील सोयाबीन आणि कपाशीने दगा दिल्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित बिघडले. रबी हंगामातील हरभर्‍यातून किमान वर्षभराच्या उदरनिर्वाह होईल, या आशेने चण्याची पेरणी केली. परंतु, रानडुकरांचा वाढता हैदोस बघता शेतकर्‍यांना शेताभोवताल कुंपण करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागत आहे.
 
 
 
k
 
 
 
यंदा रबी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभरा पिकावर शेतकर्‍यांची पूर्णपणे भिस्त आहे. सोयाबीनची रिकामी झालेली जमीन मशागत करून हरभरा पेरण्यासाठी तयार केली. हरभरा पेरल्यापासून सवंगणीपर्यंत रानडुकर पिकाची नासाडी करू शकतात. रानडुकरांचा वाढता हैदोस बघता शेतकर्‍यांना शेताच्या सभोवताल कुंपण करण्यासाठी लाकडी बांबू आणि तारांची व्यवस्था करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे.
 
 
त्याउपरही रानडुकराने चण्याचे पीक फस्त केले तर मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. सध्या हजारो शेतकरी चण्याचे पीक वाचविण्यासाठी कुंपण घालण्याच्या कामात व्यस्त आहे. रानडुकर चण्याचे पीक पेरल्यानंतर ते उकरून पेरलेले आणि अंकुरलेले हरभरे खातात. हा अनुभव शेतकर्‍यांना असल्यामुळे आर्थिक तंगी असून देखील लाकडी बांबू आणि तारांचा खर्च करण्याची तजवीज करीत आहेत. पीक वाचवण्यासाठी शेतात कुंपण करावे लागत असल्याने पैशांची जुळवा जुळव करावी लागते. शासनाने अनुदानावर कुंपणासाठी साहित्य आणि उपकरणे द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0