तभा वृत्तसेवा
पुसद,
kasola-accident : तालुक्यातील कासोळा परिसरात शनिवारी संध्याकाळी भरधाव कंटेनर आणि ट्रॅव्हल्सला झालेल्या भीषण अपघातात आठजण जखमी झाले आहेत. मुंबईकडे प्रवासी घेऊन जाणाèया ट्रॅव्हल्सला समोरून येणाèया कंटेनरने जोरदार धडक दिली. यात ट्रॅव्हल्स चालक विनोद चव्हाण (वय 35, मोहा, ता. पुसद) यांच्यासह आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
काळी दौलतखान येथून प्रवासी घेऊन मुंबईकडे निघालेली ट्रॅव्हल्स एमएच29 बीई3235 पुसदमार्गे प्रवास करत असताना कासोळा गावाजवळील वळणावर समोरून येणाèया कंटेनर टीएस01 बीसी1753ने ट्रॅव्हल्सला समोरासमोर धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, या अपघातात ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
कंटेनर चालकाचा अतिवेग आणि वळणावर असलेली कमी दृश्यमर्यादा ही या अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे समोर आले आहे. अपघाताच्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक, गतीरोधक किंवा प्रकाशयोजना नसल्याने येथे अपघात वारंवार घडत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे.
या अपघातामुळे महागाव-पुसद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही वाहने रस्त्याच्या मध्यभागी अडकून राहिल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पुसद पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र नागरिकांच्या मते ते जवळपास दोन तास उशिरा पोहोचले.