कारसह ७.८१ लाखांचा दारूसाठा पकडला

09 Nov 2025 19:21:13
वर्धा, 
liquor-cache : नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. याच आचारसंहितेदरम्यान अवैध दारूविक्रीला ब्रेक लागावा या हेतूने पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी दारू विक्रेत्यांविरुद्ध मोर्चा उघडला आहे.
 
 
 k
 
पोलिस उपनिरीक्षक विशाल सवाई यांच्या नेतृत्वात चमूने धडक कारवाई करून कारसह ७ लाख ८१ हजाराचा दारूसाठा पकडला. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सिद्धार्थनगर परिसरात नाकेबंदी केली. दरम्यान, एम. एच. ३२ वाय. २५४१ क्रमांकाच्या कारला पोलिसांनी थांबण्याचा ईशारा केला. पण, चालकाने वाहनासह पोबारा केला.
 
 
पोलिसांनीही या वाहनाचा पाठलाग केला. वाहन लक्ष्मीनगर आलोडी परिसरात आढळून आले. पण वाहनात कुणीच नव्हते. वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी दारू भरलेले वाहन जप्त केले. या कारवाईत देशी-विदेशी दारूसाठ्यासह ७ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात शरद गायकवाड, विशाल सवाई, शैलेश चाफलेकर, प्रशांत वंजारी, गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, अक्षय सावळकर, वैभव जाधव, श्रावण पवार, रंजित बुरशे, शिवा डोईफोडे, नंदकिशोर धुर्वे, अभिषेक मते यांनी केली.
Powered By Sangraha 9.0