अकोला,
tender-process-akola : महानगरपालिकेच्या बाजार वसुलीसाठी काढलेल्या पहिल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, मनपाला सध्या दैनंदिन बाजारातून मिळणाऱ्या महसुलापासून तोटा सहन करावा लागत आहे. कारण संपूर्ण शहरातील बाजार वसुलीची जबाबदारी फक्त सहा कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
महानगरपालिकेकडून रस्त्याच्या कडेला हातगाडी किंवा मोकळ्या जागेवर व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून दररोज बाजार शुल्क आकारले जाते. यापूर्वी ही वसुली स्वाती इंडस्ट्रीज कंपनी मार्फत कंत्राटी पद्धतीने केली जात होती. मात्र, त्यांचा करार ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपुष्टात आला. त्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांकडूनच वसुलीचे काम पाहिले जात आहे. मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. पूर्वी बाजार शुल्क १० ते १५ रुपये इतके होते. प्रशासनाने ते वाढविण्याचा निर्णय घेत समिती स्थापन केली.
समितीने शुल्क दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, मात्र तो आठ महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याने मनपाला आर्थिक तोटा झाला. शेवटी प्रशासनाने बाजार शुल्कात वाढ करून नवीन टेंडर काढले, परंतु सुमारे दोन कोटी रुपयांची अपेक्षित बोली असल्याने ठेकेदारांनी या टेंडरकडे पूर्णतः पाठ फिरवली. त्यामुळे आता प्रशासनाने दुसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवली आहे. यापूर्वी बाजार वसुलीचा ठेका ९६ लाख रुपयांमध्ये देण्यात आला होता. त्यामुळे कंत्राटदाराने कितीही वसुली केली तरी मनपाला ९६ लाख रुपये महसूल निश्चित मिळत होता. करार संपल्यानंतर मनपाच्या कर्मचाऱ्यांवर वसुलीची जबाबदारी टाकण्यात आली. मात्र, केवळ सहा कर्मचारी या कामासाठी नियुक्त असल्याने वसुलीचे प्रमाण अत्यल्प आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने पुन्हा टेंडर काढले असले तरी ठेकेदारांनी त्यात रस दाखवलेला नसल्याचे चित्र आहे.