१६६ नगरसेवकांचे भविष्य २ लाख ७६ हजार ६९० मतदारांच्या हाती

09 Nov 2025 19:22:49
उमेश ताकसांंडे
वर्धा, 
municipal-council-elections : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांसाठी निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र, युती आणि आघाड्यांबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. युती आणि आघाड्यांबाबतचा निर्णय झाल्यास निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होण्याची शयता असल्याने सर्वच पक्ष सावधगिरीने पावले टाकताना दिसून येत आहेत. इतर पक्षाच्या तुलनेत भाजपाकडून तिकीट मागणार्‍यांची संख्या मोठी आहे. जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांमधील ८२ प्रभागांमधून १६६ नगरसेवक निवडायचे असून त्यांचे भवितव्य २ लाख ७६ हजार ६९० मतदारांच्या हाती आहे.
 

k 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपरिषद निवडणुकीची तयारी सुरू आहे. नामांकन प्रक्रिया सोमवार १० रोजी सुरू होणार आहे. मतदार यादी देखील अद्ययावत करण्यात आली आहे. जिल्ह्यात सहा नगरपरिषदांमधील ८२ प्रभागांमधून १६६ नगरसेवक निवडले जाणार आहेत. निवडणूक विभागाने यासाठी मतदार यादी अद्ययावत केली आहे. वर्धा नगरपरिषदेत २० प्रभागातील ८८ हजार १३ मतदार असून ४० नगरसेवकांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत.
 
 
हिंगणघाट नपत २० प्रभागातील ९४ हजार ३५९ मतदार ४० नगरसेवक, आर्वीमध्ये १२ प्रभागातील ३६ हजार ४०७ मतदार २५ नगरसेवकांकरिता मतदान करतील तर पुलगावमध्ये १० प्रभागातील २९ हजार ६५ मतदार २१ नगरसेवक निवडून देतील. देवळी नगरपरिषदेत १० प्रभागातील १६ हजार ४५८ मतदार २० नगरसेवक निवडून देतील तसेच सिंदी रेल्वे येथील १० प्रभागातील २० नगरसेवकांचे भाग्य १२ हजार ३८८ मतदारांच्या हाती आहेत.
 
 
नपच्या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष प्रचार सुरू व्हायचा असला तरी समाज माध्यमावरून आणि भेटीगाठीतून प्रचार केला जात आहे. राष्ट्रीय पक्षाने तिकीट नाकारल्यास अनेकांनी अपक्ष निवडणूक लढण्याची तयारीही केली आहे. वेळेवर पक्षात सामील झालेल्यांना तिकीट दिल्यास निष्ठावंत नाराज होण्याची शयता आहे. सध्या भाजपाकडे तिकीट मागणार्‍यांची गर्दी आहे.
 
 
हिंगणघाट आणि आर्वीत चार मतं
 
 
जिल्ह्यातील सहा नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. वर्धा, पुलगाव, देवळी आणि सिंदी रेल्वे येथील मतदार प्रत्येकी तीन मतं दोन नगरसेवक आणि एका नगराध्यक्षासाठी तर हिंगणघाट आणि आर्वी येथील मतदारांना ३ नगरसेवक आणि १ नगराध्यक्षासाठी असे चार मतं टाकावी लागणार आहे.
Powered By Sangraha 9.0