नागपूर,
nagpur-iiit-nagpur : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, नागपूर (आयआयआयटीएन) येथील आर्यन कडमोरे, आदित्य प्रविण भालेराव आणि रवीना विलास बसरीमराड या द्वितीय वर्षाचे विद्यार्थ्यांनी कोपनहेगन, डॅनमार्क येथे दिनांक ५ व ६ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘डिजिटल टेक समिट २०२५’ मध्ये भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने प्रतिनिधित्व केले. ‘डीटीयू स्कायलॅब’ व जागतिक औद्योगिक भागीदारांनी आयोजित केलेल्या नेक्स्ट जनरेशन डिजिटल अॅक्शन प्रोग्राम मध्ये या त्रिकुटाच्या ‘ वायए-इन-१’ या टीमची निवड झाली होती.

जगभरातील तरुण नवोन्मेषकांना शाश्वतता, अन्नसुरक्षा आणि डिजिटल परिवर्तन या क्षेत्रांत उपाय शोधण्याची संधी या कार्यक्रमात दिली जाते. 'वायए-इन-१ ’ ने आव्हान २: कृषी उत्पादनांमध्ये अफलाटॉक्सिनचा शोध घेणे या संशोधन समस्येवर काम केले, जी केनियाच्या कृषी आणि पशुधन मंत्रालय व डॅनमार्कच्या परराष्ट्र मंत्रालय यांनी मांडली होती. या समस्येवर टीमने सादर केलेला “Verdan” हा कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित मोबाईल प्लॅटफॉर्म विजयी ठरला. हा अॅप मका व इतर धान्यांतील अफ्लाटॉक्सिन दूषितपणा शोधतो, ऑफलाइन कार्यक्षम असून ग्रामीण शेतकऱ्यांना परस्पर ज्ञानविनिमयाची संधी देतो. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुमारे १ लाख रुपयांचे प्रवेग पुरस्कार व भारताचे सर्वोत्तम प्रदर्शन करणारी टीम म्हणून मान्यतेचे राष्ट्रीय पुरस्कार अशा दोन सन्मान या टीमने मिळविले. स्पर्धेचे परीक्षण तज्ज्ञ समितीने केले, तर एलिझाबेथ मॅटिओली, डेन्मार्क दूतावास, नैरोबी यांनी मुख्य परीक्षक म्हणून काम पाहिले. मार्गदर्शन डॉ. स्नेहल बी. शिंदे (सहाय्यक प्राध्यापक, सीएसई, आयआयआयटीएन) यांनी केले. ‘वरदान’ अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून त्याचा पेटंट देखील दाखल करण्यात आला आहे. डेनमार्क भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी भारताचे राजदूत मनिष प्रभात यांची भेट घेतली आणि ‘वंदे मातरम’ गीत सामूहिकरीत्या गाऊन सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश दिला.