पोलिस दलात आयकर विभागाच्या नोटिसांनी खळबळ

09 Nov 2025 20:46:08
बुलडाणा, 
buldhana-news : जिल्ह्यातील पोलिस दलात तब्बल १ हजार ५० पोलिस अंमलदारांना आयकर विभागाने करचोरीच्या संशयावरून नोटिसा बजावल्या आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत अनेकांनी आयकर रिटर्नमध्ये बोगस कपाती दाखवून करचोरी केल्याचे उघड झाले आहे.
 
 
jk
 
आयकर विभागाने थेट पोलिस अधीक्षक कार्यालयालाच याबाबत अधिकृत नोटीस पाठवली असून संपूर्ण पोलिस दलात यानंतर खळबळ माजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी कलम ८०-सी आणि गृहकर्जावरील व्याज सवलतीच्या अंतर्गत खोट्या गुंतवणुकी दाखवून कर कपात मिळवली, प्रत्यक्षात विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृहकर्ज नसतानाही मोठ्या रकमेच्या कपाती दाखवल्या गेल्या. हे सर्व रिटर्न्स’एका ठराविक चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून दाखल करण्यात आले होते. आयकर विभागाच्या प्राथमिक चौकशीत एकाच साचेबद्ध पद्धतीने दाखल केलेले आढळल्याने या घडामोडींना गती मिळाली.
 
 
विभागाने संबंधितांची संपूर्ण फाईल उघडून तपास सुरू केला असून आर्थिक गैरप्रकाराच्या शयता तपासल्या जात आहेत. चार्टर्ड अकाउंटंटच्या संगनमताचा संशय गडद असून या माध्यमातून गेल्या तीन ते चार वर्षांत अनेक पोलिस कर्मचार्‍यांनी वैयक्तिक फायद्यासाठी कर नियमांची पायमल्ली केल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद असल्याचे समजते. आयकर कायद्यानुसार जर या कपाती बनावट ठरल्या तर संबंधित कर्मचार्‍यांना थकलेला कर त्यावरील व्याज तसेच दंड भरावा लागणार आहे. या प्रकरणामुळे बुलढाणा पोलिस दलात तसेच जिल्हा प्रशासनातही एकच खळबळ उडाली आहे.
 
 
या प्रकरणी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी ६ नोव्हेंबर रोजी सर्व पोलिस अंमलदारांना आपले आयटीआर तपासून जर चूक आढळल्यास तत्काळ सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तांबे यांनी स्पष्ट केले की, बनावट कपात दाखवणारे कर्मचारी आणि त्यांना सल्ला देणारे दोघांनाही जबाबदार धरले जाईल. .
Powered By Sangraha 9.0