तभा वृत्तसेवा
पुसद,
sambha-sarkunde : एका छोट्याशा गावात राहणारे व उच्चपदावर सेवा देऊन निवृत्त होणार संभा मोतीराम सरकुंडे यांना अमेरिकेतील लाफायेत स्थित लुईजियाना या सरकारी विद्यापीठाने 16 नोव्हेंबर 2025 रोजी मानद पीएच.डी. देऊन सन्मान करण्यात आला. तालुक्यातील पाळूवाडी येथील सेवानिवृत आय.ए.एस. अधिकारी संभाजी सरकुंडे हे एका आदिवासी दुर्गम गावातून येतात. त्यांना आता मानद पीएचडी मिळाल्याने तालुक्यामध्ये कौतुक होत आहे.
वर्ष 1962 मध्ये ते प्रथमतः जिल्हा परिषदेच्या नव्याने उघडलेल्या प्राथमिक शाळेतून प्रविष्ट होऊन पुढे बी.ए., एलएल.बी., पी.जी.डी., टी.डी.एम. (ग्रामीण विकास राष्ट्रीय संस्था हैदराबाद) असे उच्चशिक्षित होऊन त्यांनी प्रथम भारतीय रिझर्व बँक व त्यानंतर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेत सेवा दिली. पुढे भारतीय प्रशासकीय सेवेत नामांकन प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, जिल्हाधिकारी भंडारा, अतिरिक्त विभागीय आयुक्त अमरावती व नागपूर आणि त्यानंतर राज्य आदिवासी विकास आयुक्त नाशिक, व्यवस्थापकीय संचालक आदिवासी विकास महामंडळ नाशिक आणि त्यानंतर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे सेवा देऊन 2016 मध्ये सेवानिवृत झाले. त्यानंतर देखील महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यांना राज्य माहिती आयुक्त म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्ती दिली. या पदावर त्यांनी सुदूर आभासी पद्धतीने काम करण्यासाठी विशेष वेब अॅप्लिकेशन तयार केले. त्यांनी सामान्य लोकांना माहितीचे प्रदान व्हावे म्हणून 436 अधिकाèयांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा दंड करून 50 अधिकाèयांना विभागीय चौकशीसमोर आणले.
माहिती अधिकाराच्या आदेशामुळे आदिवासींना जमिनी प्रत्यार्पण करण्याच्या अधिनियमांनुसार शेकडो लोकांना जमिनी प्राप्त झाल्या. अशा प्रकारे त्यांनी माहिती अधिकार अधिनियमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. त्यांनी गोहाती येथे आंतरराष्ट्रीय परिषदेतही सहभाग नोंदवला. कॅनडा येथील टोरांटो विद्यापीठाने त्यांना प्रशासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले. ते आजही आदिवासी अत्याचार, आदिवासी जमीन प्रकरणे याबाबत कमालीचे आग्रही असतात. याचीच पावती म्हणून त्यांना पीएचडी देण्यात आली आहे.