जिल्ह्यात साडेनऊ हजार मतदार दुबार

09 Nov 2025 21:57:25
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
voters-yavatmal-elections : सर्वत्र उठलेले दुबार, तिबार मतदारांच्या नावाचे लोन जिल्ह्यातही पसरले आहे. जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि एका नगरपंचायतीत तब्बल 9 हजार 481 मतदारांची दुबार, तिबार नावे आहेत. या नावांची यादी आयोगाने दहाही पालिका तसेच नगर पंचायतीला पाठवली असून, त्या नावावर आता फुली मारल्या जाणार आहे.
 
 
k
 
देशात सध्या मतदार यादीवरून चांगलेच वादंग उठले आहे. अशातच राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. त्यामुळे मतदार यादीतील दुबार, तिबार नावांचे वादळ सर्वत्र सुरू झाले आहे. हा प्रकार निवडणूक आयोगाच्या लक्षात आला असून, दुबार, तिबार नावे असलेल्यांची यादी पाठविण्यात सुरवात झाली आहे.
 
 
जिल्ह्यात यवतमाळ, नेर, दारव्हा, दिग्रस, पुसद, उमरखेड, आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, वणी, अशा दहा नगर पालिका आणि ढाणकी नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. एकूण 5 लाख 66 हजार 584 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या यादीमधील 9 हजार 481 मतदारांची दुबार आणि तिबार नावे असल्याची बाब उजेडात आली आहे.
 
 
त्यावरून आयोगाने ही यादी पालिका आणि नगरपंचायतीला पाठवली आहे. या नावापुढे आता फुली मारण्यात येणार आहे. यासंदर्भातचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहे. तर दुबार आणि तिबार नावे असलेल्या मतदारांकडून कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबतचा अर्ज भरून घेतला जाणार आहे. एकही मतदार दुबार मतदान करणार नाही, याची काळजी निवडणूक निर्णय अधिकाèयांकडून घेतली जाणार आहे.
 
---------------------------
नगरपालिका दुबार मतदार संख्या
---------------------------
यवतमाळ : 6221
पुसद : 314
वणी : 343
उमरखेड : 493
दिग्रस : 344
पांढरकवडा : 509
दारव्हा : 320
घाटंजी : 64
आर्णी : 451
नेर : 324
ढाणकी : 98
---------------------------
एकूण : 9481
---------------------------
Powered By Sangraha 9.0