उमेदवारी अर्ज भरावा लागेल ऑनलाईन

09 Nov 2025 20:29:17
वर्धा, 
candidacy-application-online : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील ६ नगरपालिकांची निवडणूक होऊ घातली आहे. १० नोव्हेंबरपासून इच्छुक उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून उमेदवाराने ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर त्या अर्जाची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करणे क्रमप्राप्त राहणार आहे.
 
 
k
 
वर्धा, देवळी, सिंदी रेल्वे, पुलगाव, आर्वी व हिंगणघाट या सहा नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. विविध राजकीय पक्षांकडून नगरसेवक व नगराध्यक्षाकरिता इच्छुक असलेल्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. भाजपाकडून इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या असून ९ रोजी काँग्रेसनेही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
 
 
नगराध्यक्ष असो वा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढू इच्छिणा-या उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही प्रक्रिया करताना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतरच अर्ज करून अर्जाची प्रिंट निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना सादर करावी लागणार आहे. विशेष म्हणजे एका प्रभागातून एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार अर्ज भरता येणार आहे. १७ नोव्हेंबर ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
 
 
सहा नगर पालिकेत नगरसेवक आणि नगराध्यपदाच्या उमेदवारांचे अर्ज स्विकारण्यासाठी वेगळे टेबल लावण्यात येणार आहे. उमेदवारांचे नामनिर्देशन स्विकारण्यासाठी वर्धा व हिंगणघाट नगरपालिकेत किमान ५ टेबल राहणार असून तर उर्वरित चार नगरपालिकांमध्ये कुठे दोन तर कुठे तीन किंवा चार टेबल राहणार आहे.
 
 
नगर पालिकानिहाय मतदान केंद्र वर्धा : ८९, हिंगणघाट : १०४, आर्वी : ४३, पुलगाव : ३२, देवळी : २० तर सिंदी (रेल्वे) येथे २० केंद्र राहणार आहेत. तर वर्धा नगर पालिकेत ८८०१३ मतदार असुन यात ४३ हजार १३८ पुरुष तर ४४ हजार ८६६ महिला तर ९ इतर मातदार आहेत. हिंगणघाट शहरात ९४ हजार ३५६ मतदार आहेत. यात ४७ हजार २६५ पुरुष तर ४७ हजार ०९१ महिला मतदार आहेत. आर्वी येथे ३६ हजार ४०७ मतदारांमध्ये १८ हजार २१९ पुरुष तर १८ हजार १८८ महिला मतदार आहेत. पुलगाव येथे २९ हजार ०६५ मतदार आहेत. या १४ हजार १९९ पुरुष तर १४ हजार १६६ महिला मतदार आहेत. देवळी येते १६ हजार ४५८ मतदारांमध्ये ८ हजार १६७ पुरुष तर ८ हजार २९१ महिला मतदारा आहेत. सिंदी (रेल्वे) येथे १२ हजार ३८८ मतदारांमध्ये ६ हजार १३४ पुरुष तर ६ हजार २५४ स्त्री मतदार आहेत.
Powered By Sangraha 9.0