तिवसा,
accident-tiwasa : तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोझरी बायपास वळण मार्गावर रविवारी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार आणि त्यांच्यासोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगात येणार्या चारचाकी वाहनाने विरुद्ध दिशेने येणार्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
अपघातात देविदास महादेव कुरवाडे (वय ५८ वर्षे, रा. तळेगाव श्यामजीपंत) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यासोबत असलेली महिला देखील गंभीर जखमी झाली आहे. दोघांनाही तातडीने उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहितीनुसार, देविदास महादेव कुरवाडे हे एम.एच. ३२ -३३८७ क्रमांकाच्या दुचाकीवरून गुरुकुंज मोझरीकडून तिवसाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार्या एम. एच. ३१—डी—४७८८ क्रमांकाच्या कारने भरधाव वेगात जाऊन दुचाकीस समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली आणि दोघेही रस्त्यावर कोसळले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले.
वळण रस्त्याचे प्रारंभस्थळ अपघात प्रवण
गुरुकुंज मोझरी ते शेंदोळा खुर्द या सुमारे सहा किलोमीटर अंतरावर नव्याने तयार करण्यात आलेला बायपास वळण मार्ग वाहतुकीसाठी पर्यायी म्हणून सुरू करण्यात आला असला तरी, गेल्या काही महिन्यांत या मार्गावर अपघातांची संख्या वाढली आहे. रस्ता अरुंद, वळणे तीव्र आणि चालक वेगाने वाहन चालवत असल्याने हा वळण रस्ता अपघातप्रवण ठरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे या धोकादायक वळणावर योग्य दिशादर्शक फलक, स्पीडब्रेकर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.