वेध
पुंडलिक आंबटकर
elect mayors महाराष्ट्रात सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काही ठिकाणी चिन्ह वाटपास विलंब झाल्याने अपक्षांवर अन्याय होऊ नये म्हणून आयोगाने 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचाराला मुभा दिली. राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या या निवडणुकीत 288 नगराध्यक्ष आणि 6 हजार 859 नगरसेवक निवडले जाणार आहे. तब्बल 1 कोटी 7 लाख 3 हजार 576 मतदार हक्क बजावणार असून यात 53 लाख 79 हजार 931 पुरुष तर 53 लाख 22 हजार 870 महिला मतदारांचा समावेश आहे. इतर 775 मतदारही मतदान करणार आहे. विशेष म्हणजे, 40 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींनी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने अशा ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती न देता या निवडणुकांचे निकाल जानेवारीत होणाèया न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहील, असे सांगितल्याने येथेही निवडणुका होत आहे. परंतु, काही ठिकाणी तांत्रिक कारणांमुळे निवडणुका रद्द होण्याची शक्यता आहे.
भाजपाचे 100 नगरसेवक आणि 3 नगराध्यक्ष याआधीच अविरोध निवडून आले आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबरला मतमोजणी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. बहुतांश ठिकाणी युती आणि आघाडी नसल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यातही नाराजी-नाट्य रंगल्याने नेमका कोण निवडून येईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राकाँ अजित पवार, राकाँ शरद पवार, उबाठा, वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि अन्य अनेक छोट्या-मोठ्या पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. शिवाय मोठ्या संख्येने अपक्ष नशीब आजमावत असल्याने या निवडणुकीत गोंधळाची स्थिती आहे. प्रत्येकच प्रभागात उमेदवारांची संख्या प्रचंड वाढली आहे. कुठे डझनभर तर कुठे त्यापेक्षाही अधिक उमेदवार रिंगणात आहे.
विदर्भात भाजपाकडे मोठा जनाधार आहे. परंतु, सोबत मित्र पक्षांचे उमेदवारही रिंगणात असल्याने मतविभागणीची शक्यता आहे. अशाही परिस्थितीत बहुतांश ठिकाणी भाजपा आणि काँग्रेस या दोनच पक्षांत थेट लढत असल्याचे जाणकार सांगतात. 2 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 ही मतदानाची वेळ आहे. 13 हजार 355 केंद्रांवर मतदान होणार असून 13 हजार 726 कंट्रोल युनिट आणि 27 हजार 452 बॅलेट युनिट उपलब्ध करण्यात आले आहे. या निवडणुकीसाठी 66 हजार 775 अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. भाजपाच्या अविरोध ठरलेल्या नगरसेवकांमध्ये विदर्भ 3, मराठवाडा 3, कोकण 4, उत्तर महाराष्ट्र 49 आणि पश्चिम महाराष्ट्रातील 41 नगरसेवकांचा समावेश आहे. ही निवडणूक नागपूर विभागातील 55 नगरपालिका व नगरपंचायती, अमरावती 45, पुणे 60, नाशिक 49, संभाजीनगर 52 आणि कोकण विभागातील 27 नगरपालिका व नगरपंचायतींसाठी होत आहे. भाजपाने या निवडणुकीतही आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांमुळे उमेदवारांना विजयाची हमी वाटत आहे. स्टार प्रचारक प्यारे खान आणि जमाल सिद्दिकी हे अल्पसंख्यक समाजापुढे भाजपाची पारदर्शक भूमिका पटवून देण्यात यशस्वी झाले आहे.elect mayors दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी ताकद लावली आहे. भाजपा, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राकाँकडून विकासाच्या नावावर मते मागितली जात आहेत. दुसरीकडे काँग्रेस, राकाँ शरद पवार आणि उबाठाने आपले पारंपरिक मुद्दे पुन्हा प्रचारात आणले आहे. या निवडणुकीनंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. एकूणच आगामी तीन-चार महिने संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुकांचे वातावरण राहणार आहे.
9881716027