नवी दिल्ली,
International Space Station to be retired आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आयएसएस जवळपास तीन दशकांच्या यशस्वी प्रवासानंतर २०३० मध्ये निवृत्त होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तथापि, त्याचे पूर्ण संचालन थांबण्यास २०३५ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे. अवकाश संशोधनाच्या इतिहासात सर्वाधिक प्रयोग, मानवी मोहिमा आणि संशोधनासाठी वापरले गेलेले हे स्थानक आरोग्य, शेती, पाणी व्यवस्थापन, ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या विकासात क्रांतिकारी ठरले. दरम्यान या शर्यतीत चीन, भारत समोर असल्याचे बोलले जात आहे,
आयएसएसचे ऑपरेशन्स डायरेक्टर रॉबिन गॅटेन्स यांच्या मते, आपण अद्याप या स्थानकाच्या सुवर्णकाळात आहोत आणि उर्वरित काळात त्याचा अधिकाधिक वापर करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की मानवी अंतराळ प्रवास आणि वैज्ञानिक शोध यामध्ये आयएसएसचे योगदान अद्वितीय असून त्याला पर्याय निर्माण करणे हेच पुढील आव्हान आहे. दरम्यान, आयएसएसनंतर अवकाश संशोधनाची गती थांबू नये म्हणून खाजगी कंपन्या नवी व्यावसायिक अंतराळ स्थानके विकसित करण्याच्या तयारीत आहेत.
अॅक्सिओम स्पेससारख्या कंपन्या स्वयंपूर्ण मॉड्यूलर स्टेशन तयार करत असून भविष्यात ते आयएसएसची जागा घेण्याची दाट शक्यता आहे. कमी खर्चात संशोधनाच्या अधिक संधी उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट मानले जात आहे. याचसोबत चीनने आपल्या टियांगोंग स्थानकाच्या माध्यमातून आगळीच दिशा घेतली आहे. पृथ्वीभोवती ३४० ते ४५० किमी उंच कक्षेत कार्यरत असलेले हे स्थानक कायमस्वरूपी मानवयुक्त संशोधनासाठी सज्ज होत आहे. दुसरीकडे अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन कंपनीही स्वतंत्र अंतराळ स्थानक उभारण्याच्या तयारीत असून व्यावसायिक अवकाश पर्यटन आणि संशोधन यातून नवी क्रांती अपेक्षित आहे. या स्पर्धेत भारतही मागे नाही. इस्रो BAS नावाचे भारतीय अंतराळ स्थानक पूर्ण क्षमतेने उभारण्याच्या तयारीत आहे. २०२८ मध्ये याचे पहिले मॉड्यूल अवकाशात सोडण्याची योजना असून भारताचे अवकाश संशोधन स्वावलंबी आणि अधिक सक्षम होण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.