मुंबई
V. Shantaram biopic भारतीय चित्रपटसृष्टीला नवे तत्त्वज्ञान, नवी सौंदर्यभाषा आणि आधुनिक दृष्टी देणारे दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या जीवनावर आधारित भव्यदिव्य बायोपिकचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून सोशल मिडियावर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. साध्या कामगारापासून जागतिक स्तरावरील दिग्दर्शकापर्यंतचा शांताराम यांचा प्रवास या चित्रपटातून पहिल्यांदाच सिनेमॅटिक महाकाव्याच्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.
भारतीय चित्रपटाला नवीन मार्गदर्शक ठरणाऱ्या ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘अमृतमंथन’ आणि ‘नागरिक’ यांसारख्या प्रयोगशील चित्रपटांची परंपरा निर्माण करणाऱ्या शांताराम यांच्या जीवनकथेची सिनेमॅटिक मांडणी राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे निर्मित या चित्रपटात करण्यात आली आहे. ‘आणि… डॉक्टर काशिनाथ घाणेकर’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजित शिरीष देशपांडे यांनी लेखन व दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली असून त्यांनी या चित्रपटाला आशयाची उंची आणि दृश्यवैभवाची भव्यता देण्याचा प्रयत्न केला आहे.
या बायोपिकमध्ये V. Shantaram biopic अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी व्ही. शांताराम यांच्या भूमिकेत झळकणार असून ही भूमिका त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. पहिल्याच पोस्टरमधून दिसणारी ग्रँड दृश्यरचना आणि सिनेमॅटिक भव्यता पाहता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.दिग्दर्शक अभिजित देशपांडे म्हणाले, “व्ही. शांताराम हे नाव उच्चारताना केवळ एका व्यक्तीची नव्हे तर भारतीय चित्रपटाच्या तत्त्वज्ञानाची संपूर्ण परंपरा डोळ्यासमोर उभी राहते. त्यांच्या संघर्ष, निष्ठा आणि प्रयोगशीलतेचे पडद्यावरील चित्रण करताना आम्हाला एक अनोखा आध्यात्मिक अनुभव मिळाला. प्रत्येक फ्रेममधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी हा आमचा प्रयत्न आहे.”
निर्माते राहुल किरण V. Shantaram biopic शांताराम यांनी भावूक होत सांगितले, “हा चित्रपट म्हणजे आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून आजोबांच्या कर्तृत्वाला वाहिलेली मोठी श्रद्धांजली आहे. त्यांनी भारतीय चित्रपटाला दिलेले योगदान किती व्यापक आहे हे नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी आम्ही हा चित्रपट संवेदनशीलतेने व तांत्रिक उत्कृष्टतेने साकारत आहोत.”निर्माते सुभाष काळे म्हणाले, “व्ही. शांताराम यांचे नाव घेताच भारतीय चित्रपटाचा संपूर्ण इतिहास उभा राहतो. एका मराठी माणसाने जागतिक दर्जाची फिल्म इंडस्ट्री घडवण्यात दिलेले योगदान अभिमानास्पद आहे. त्यांच्या प्रयोगशीलतेचा आणि दृष्टीकोनाचा खरा आत्मा या चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल.”राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन प्रस्तुत हा भव्यदिव्य बायोपिक येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून भारतीय चित्रपटप्रेमींसाठी हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.