ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर बंदी....

10 Dec 2025 09:26:00
पर्थ,
Ban on Facebook, Instagram, YouTube ऑस्ट्रेलियात सोशल मीडियावर मोठी कारवाई सुरू झाली असून फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबसह दहा प्लॅटफॉर्मवर १६ वर्षांखालील मुलांच्या वापरावर पूर्ण बंदी लागू करण्यात आली आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्या सरकारने १० डिसेंबरपासून हा कठोर नियम अमलात आणताच देशातील लाखो मुलांची खाती निष्क्रिय झाली. जगातील अशा प्रकारची ही पहिलीच व्यापक कारवाई मानली जात आहे आणि त्यामुळे इतर देशही ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत.
 
 
 
Ban on Facebook, Instagram, YouTube
 
सरकारने या बंदीमागचा उद्देश स्पष्ट केला आहे, व्यसन निर्माण करणारे अल्गोरिदम, ऑनलाइन फसवणूक, सायबरबुलिंग आणि हानिकारक कंटेंटपासून मुलांचे संरक्षण. डिजिटल जगात वाढत असलेल्या पिढीला सुरक्षित वातावरण देण्यासाठी पालकांच्या मागण्यांनाही या पावलाने प्रतिसाद दिला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. इंस्टाग्राम, फेसबुक, थ्रेड्स, स्नॅपचॅट, टिकटॉक, यूट्यूब, रेडिट, ट्विच, एक्स आणि किक या प्लॅटफॉर्मना नवीन कायद्यानुसार १६ वर्षांखालील वापरकर्त्यांची खाती बंद करणे आणि वय पडताळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन न केल्यास जवळपास ५० दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्स दंडाची तरतूद आहे. टिकटॉकने १० डिसेंबरपासून सर्व अल्पवयीन खाती निष्क्रिय करण्याची घोषणा केली असून ट्विचवरही मुले नवीन खाते उघडू शकत नाहीत.
 
 
तरीही काही प्लॅटफॉर्मना या बंदीपासून सूट देण्यात आली आहे. डिस्कॉर्ड, गिटहब, गुगल क्लासरूम, लेगो प्ले, मेसेंजर, पिंटरेस्ट, रोब्लॉक्स, स्टीम, व्हॉट्सअॅप आणि यूट्यूब किड्स यांचा यात समावेश आहे. विशेषतः रोब्लॉक्सला दिलेली सूट अनेकांना आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. आतापर्यंत वापरकर्त्यांनी फक्त जन्मतारीख भरून खाते उघडत असले, तरी नव्या नियमांनुसार प्लॅटफॉर्मना वयाची खात्री प्रत्यक्ष तंत्रज्ञानाच्या मदतीने करावी लागणार आहे. यासाठी ‘व्हिडिओ सेल्फी’सह चेहऱ्यावरून वयाचा अंदाज लावणाऱ्या प्रणालींचा वापर सुरू झाला आहे. डिजिटल युगात मुलांचे संरक्षण कितपत प्रभावीपणे करता येईल याची ही मोठी चाचणी मानली जात असून, या बंदीचा पुढील परिणाम जगभरातून उत्सुकतेने पाहिला जात आहे.
Powered By Sangraha 9.0