सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची भूमिका महत्त्वाची - आ.विजय वडेट्टीवार

10 Dec 2025 14:12:30
नागपूर,
vijay vadettiwar भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेद्वारे आदर्श अशी संसदीय लोकशाही आपल्याला दिलेली आहे. विधिमंडळ सभागृहाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबरोबर सत्ताधारी पक्षावर नियंत्रण ठेवण्यासाठी विरोधी पक्षाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असल्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
 
 
vijay vadettivae
 
 
विधानभवन येथे 51 व्या संसदीय अभ्यासवर्गात ‘संसदीय लोकशाहीत सत्तारुढ व विरोधी पक्षाचे स्थान व भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.वडेट्टीवार बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर उपस्थित होत्या. सुरुवातीस श्रीमती तळेकर यांनी श्री.वडेट्टीवार यांचा परिचय करून दिला.
शासन, प्रशासन हे पारदर्शक असणे आवश्यक आहे. शासनाला पारदर्शकता, शासकीय कारभाराबाबत प्रश्न विचारण्याची भुमिका सामान्य माणसाच्यावतीने विरोधी पक्ष पार पाडत असतो. त्यांच्यावतीने विरोधी पक्ष ही भूमिका पार पाडत असतो. विरोधी पक्ष शासनाची चुकीची धोरणे, निर्णय जनतेच्या लक्षात आणून देतो. सत्ताधारी पक्षांसोबत त्यांच्या बरोबरीने चालणारा विरोधी पक्ष हा प्रगल्भ लोकशाहीचे लक्षण आहे. त्यामुळे विरोधी पक्ष खंबीर, मजबूत असणे आवश्यक असल्याचे श्री.वडेट्टीवार म्हणाले.
चांगल्या कामांसाठी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांसोबत असतो. तसेच सत्ताधारी पक्षाने देखील विरोधी पक्षासोबत असणे गरजेचे असते. विरोधक केवळ चुका काढण्याचे आणि चुकीच्या गोष्टींवर प्रहार करण्याचेच काम करत नाही, तर शासनास चांगल्या सूचना देखील करत असतो. बऱ्याचदा विरोधी पक्षांकडून अविश्वास प्रस्ताव सादर केले जातात. प्रस्ताव मंजूर होणार नाही याची कल्पना असते. मात्र, हे प्रस्ताव सभागृहात सत्ताधारी पक्षांच्या चुका निदर्शनास आणून देणे व जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे यासाठी आवश्यक असतात, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
संसदीय लोकशाहीत सभागृह सदस्यांना आपली मते, प्रश्न, समस्या मांडण्यासाठी विविध प्रकारची आयुधे उपलब्ध आहेत. एखादा विरोधी पक्षाचा नेता देखील या आयुधांचा उत्तम वापर करून आपल्या मतदारसंघाकरीता कामे मंजूर करून घेऊ शकतो, ही आपल्या संविधानाची ताकद आहे. याच आयुधांचा वापर बहुमत असलेल्या सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी केला जातो. शेवटी सर्वसामान्य माणसाच्या कल्याणासाठी दोन्ही बाजूंची भूमिका महत्वाची आहे. सभागृहात जनतेचे प्रतिनिधित्व करताना आपल्या चांगल्या कामातून सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद कसा येईल, असे काम दोन्ही बाजूंच्या लोकप्रतिनिधींनी केले पाहिजे, असे श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0