नवी दिल्ली,
Chef Vishnu Manohar नागपूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शेफ विष्णु मनोहर आगामी डिसेंबरमध्ये दिल्लीमध्ये विशेष महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन करणार आहेत. १२ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत कस्तुरबा मार्गावरील महाराष्ट्र सदन येथे हा महोत्सव रंगणार असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भाच्या पारंपरिक खाद्यपरंपरेची चव दिल्लीकरांना अनुभवता येणार आहे.
कार्यक्रमाला भेट देणाऱ्यांसाठी नागपूरच्या खमंग आणि तिखट-चविष्ट पदार्थांची मेजवानी असणार आहे. विशेष आकर्षण म्हणून नागपुरी सावजी चिकन, मटन रस्सा, तऱ्ही पोहे आणि नागपूरच्या खास संत्र्यांपासून बनवलेल्या मिठाई यांचा समावेश करण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या पाककलेतील अस्सल मसाले, पारंपरिक पद्धती आणि घरगुती चवीचा अनुभव देणे हे या महोत्सवाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे आयोजकांनी सांगितले.
शेफ विष्णु मनोहर यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाला विशेष आकर्षण लाभणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातील खाद्यपरंपरा आणि नागपूरच्या वैशिष्ट्यपूर्ण चवींची ओळख करून देण्याची संधी दिल्लीकरांना मिळणार आहे. स्थानिक रहिवाशांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांसाठी हा एक खाद्यसंस्कृतीचा उत्सव ठरणार आहे.दिल्लीतील लोकांना पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांची चव घेता यावी आणि महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेची ओळख व्हावी, यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक रंगत, खाद्यविविधतेचा सुगंध आणि महाराष्ट्राचा अस्सल आत्मा यांचा मिलाफ अनुभवता येईल.या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी सर्व खाद्यप्रेमींना केले असून, दिल्लीकरांसाठी स्वादिष्ट आणि संस्मरणीय असा हा महोत्सव ठरणार आहे.