खाजगी रुग्णालयात मृत्यू आणि सार्वजनिक रुग्णालयात नेऊन टाकला!

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
लखनऊ,
Death in a private hospital लखनऊच्या कृष्णा नगरमधील एका खाजगी रुग्णालयात घडलेली अमानुष घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करत तो सरकारी रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाबाहेर रुग्णवाहिकेत आणून सोडला आणि तिथून पसार झाले. मृतदेह अनेक तास दुर्लक्षित अवस्थेत पडून राहिला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सरकारी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना सूचना दिल्या आणि नंतर मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.
 

Death in a private hospital 
 
ही धक्कादायक घटना ३७ वर्षीय करमवीर सिंह यांच्याशी संबंधित आहे. सरोजिनी नगरमध्ये राहणारे करमवीर सोमवारी नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडले, मात्र वाटेत प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनी एसकेडी रुग्णालयाचा आश्रय घेतला. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर रुग्णालयाने कुटुंबाला कळविण्याऐवजी मृत्यू दडपण्याचा मार्ग अवलंबला आणि मृतदेह लोकबंधू राज नारायण रुग्णालयात स्ट्रेचरवर ठेवून पळ काढला. सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ही परिस्थिती समजून येईपर्यंत मृतदेह तिथेच पडून होता.
 
पोलिसांनी तपास केला असता मृतदेहाच्या खिशात सापडलेल्या मोबाइल फोन आणि आधार कार्डच्या आधारे त्याची ओळख पटली आणि कुटुंबाला माहिती देण्यात आली. घटनेचे सीसीटीव्ही दृश्यही समोर आले असून, त्यात खाजगी रुग्णालयातील दोन कर्मचारी स्ट्रेचरवर मृतदेह ठेवून आपत्कालीन गेटबाहेर सोडताना दिसत आहेत. करमवीर यांच्या कुटुंबाने रुग्णालयावर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला असून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा आरोग्य विभागानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. सीएमओ डॉ. एन.बी. सिंह यांनी सांगितले की, आरोपांमध्ये सत्यता आढळल्यास खाजगी रुग्णालयाविरुद्ध कठोर पावले उचलली जातील. रुग्णालयाला नोटीस बजावण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेज मागवले गेले आहेत. तसेच संपूर्ण घटनेची तपासणी करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे.