शेतकर्‍यांना आयपीएल कंपनीकडून 30 लाख 97 हजारांची भरपाई

11 Dec 2025 19:19:59
चंद्रपूर, 
Sudhir Mungantiwar : मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील 39 शेतकर्‍यांचे धान पीक ‘सॉलिड’ या कीडनाशकाच्या दुष्परिणामामुळे मोठ्या प्रमाणात खरपटून गेले असल्याची तक्रार राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी गंभीर दखल घेत तात्काळ चौकशीचे आदेश जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांना दिल्यानंतर, आयपीएल कंपनीकडून तब्बल 30 लाख 97 हजार 800 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली.
 
 
HJH
 
मूल आणि पोंभुर्णा परिसरातील शेतकर्‍यांनी धान पिकावर फवारण्यात आलेल्या ‘सॉलिड’ या कीडनाशकांच्या दुष्परिणामामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची तक्रार आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. मुल तालुक्यातील सिंतळा, भेजगाव येथील 31 शेतकरी आणि पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील 8 शेतकरी अशा एकूण 39 शेतकर्‍यांचे धान पीक औषधाच्या प्रतिकूल परिणामामुळे खरपटून गेले होते. तसेच धानाचे लोंब अजिबात न आल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आयपीएल कंपनीची ही औषधे संबंधित शेतकर्‍यांनी सिंतळा येथील कृषी केंद्रातून खरेदी केली होती.
 
 
ही गंभीर बाब लक्षात घेऊन मुनगंटीवार यांनी, जिल्हा कृषी अधीक्षक यांना चौकशी करण्याचे आणि संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानंतर कृषी विभागाने तातडीने पंचनामे, नमुना चाचण्या आणि अहवाल प्रक्रिया पूर्ण केली. त्या अनुषंगाने आयपीएल कंपनीकडून मूल तालुक्यातील 31 शेतकर्‍यांना मिळून 22 लाख 54 हजार 800 रुपये, तर पोंभूर्णा येथील 8 शेतकर्‍यांना 8 लाख 43 हजार रुपये अशी एकूण 30 लाख 97 हजार 800 रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ मंजूर करत धनादेशाचे वितरण करण्यात आले.
 
 
या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकरीबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. मूल व पोंभुर्णा परिसरातील शेतकरी बांधवांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.
Powered By Sangraha 9.0