माजी मिस स्वित्झर्लंड फायनलिस्ट क्रिस्टीनाची क्रूर हत्या

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
स्वित्झर्लंड,
Former Miss Switzerland finalist murdered माजी मिस स्वित्झर्लंड फायनलिस्ट क्रिस्टीना जोक्सिमोविच यांच्या हत्येप्रकरणी स्वित्झर्लंडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बिन्निंगेन येथे राहणाऱ्या क्रिस्टीनाचा पती थॉमस याच्यावर तिच्या निर्घृण हत्येचा आणि मृतदेहाशी छेडछाड केल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये क्रिस्टीनाचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडल्यानंतर तपास सुरू झाला आणि त्यात उघड झालेल्या धक्कादायक तपशिलांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली.
 
 
Former Miss Switzerland finalist murdered
 
शवविच्छेदन अहवालात क्रिस्टीनाचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याची पुष्टी झाली. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात उघड झाले. घरातून जप्त करण्यात आलेल्या साहित्य आणि फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारे थॉमसवर आरोप सिद्ध करण्यासाठी मजबूत पायाभूत माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. काही पुराव्यांवरून मृतदेहाचा अपमानजनक पद्धतीने नाश करण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर सुरुवातीला थॉमसनं आपली पत्नी मृत अवस्थेत आढळल्याचे सांगितले होते. मात्र, पुढील चौकशीत विसंगती आढळल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली, पण ते स्वसंरक्षणात झाले असल्याचा दावा केला. तथापि, फॉरेन्सिक तज्ञांना या दाव्याला पाठिंबा देणारा कोणताही पुरावा सापडला नाही.
 
 
क्रिस्टीनाचे अवशेष तिच्या वडिलांना संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने तपासाला गती मिळाली. तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला दिलेल्या निवेदनात आरोपीने अत्यंत थंडपणे आणि कोणतीही सहानुभूती न दाखवता गुन्हा केला असल्याचे म्हटले आहे. या दाम्पत्याला दोन मुली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. बासेल-लँडशाफ्ट सरकारी अभियोक्ता कार्यालयाने थॉमसवर खून आणि मृतदेहाशी गैरवर्तणुकीचे आरोप औपचारिकपणे दाखल केले आहेत. खटल्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. क्रिस्टीना जोक्सिमोविच यांना 2007 मध्ये मिस नॉर्थवेस्ट स्वित्झर्लंडचा किताब मिळाला होता आणि त्या मिस स्वित्झर्लंड स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. नंतर त्यांनी कॅटवॉक कोच म्हणून अनेक मॉडेल्सना प्रशिक्षण दिले होते आणि मिस युनिव्हर्स 2013 विजेत्यालाही त्यांनी मार्गदर्शन केले होते.