अमेरिका म्हणाली...पहलगाम हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबा!

11 Dec 2025 12:29:21
वॉशिंग्टन,
Lashkar-e-Taiba Pahalgam attack अमेरिकन खासदाराने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केलेल्या विधानांमुळे भारत-अमेरिका संबंधांचे महत्त्व पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी लष्कर-ए-तोयबा जबाबदार असल्याचे अमेरिकेतील हाऊस फॉरेन अफेयर्स साऊथ अँड सेंट्रल एशिया सबकमिटीचे अध्यक्ष बिल हुइझेंगा यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाकिस्तान यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. अलीकडेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसला भेट दिली होती.
 
 
 
bill huizenga
हुइझेंगा म्हणाले की भारत-अमेरिका संबंध हे आता केवळ गरजेचे न राहता २१व्या शतकातील सर्वात महत्त्वाची भागीदारी बनली आहे. अमेरिकेला लोकशाही आधारित जग हवे असेल, तर भारतासोबतची भागीदारी अत्यावश्यक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी जुलै २०२५ मध्ये ट्रम्प प्रशासनाने लष्कर-ए-तोयबा आणि त्याच्याशी संबंधित द रेसिस्टन्स फ्रंट (TRF) यांना दहशतवादी संघटना घोषित केले होते, हे आठवून दिले. या निर्णयामुळे दहशतवादाविरुद्धची अमेरिकेची भूमिका स्पष्ट होते, असेही त्यांनी अधोरेखित केले. याचवेळी त्यांनी चीनवरही निशाणा साधला. चीन आणि रशिया जबरदस्तीने सीमा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असे ते म्हणाले. इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनची आक्रमक भूमिका प्रादेशिक स्थैर्य, व्यापार आणि जागतिक समृद्धीसाठी धोका असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
 
२०२० पासून चीनने भारतीय सैनिकांवर अनेकदा हल्ले केले असून, भारताने ठोस प्रत्युत्तर देत चीनचा दबाव कमी केला आहे, असे हुइझेंगा यांनी सांगितले. आज भारत आणि अमेरिका अनेक क्षेत्रांमध्ये संरक्षण, तंत्रज्ञान, दहशतवादविरोधी लढा आणि व्यापार यांत घट्ट सहकार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर पावले उचलली. सिंधू पाणी करार स्थगित करण्यासह, ७ मे रोजी भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केला आणि दहशतवादी तळांचा नायनाट केला. या कारवाईनंतर दोन्ही देशांमध्ये चार दिवसांचा तणावपूर्ण संघर्ष सुरू राहिला आणि पाकिस्तानी विनंतीनंतर युद्धबंदी घोषित करण्यात आली.
Powered By Sangraha 9.0