उद्धव ठाकरेंना टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नागपूर,
eknath-shinde : मुख्यमंत्री पदासाठी ज्यांनी आपल्या निष्ठा आणि तत्त्वे बाजूला ठेवून तडजोड केली, अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, अशा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर गुरुवारी विधानसभेत पत्रपरिषदेत निशाणा साधला.
 
 
 
K
 
 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पांघरूण खाते आणि भ्रष्टाचारावरून सणसणीत टीका करणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे चौथ्या दिवशी हिवाळी अधिवेशनात आल्यानंतर पत्रपरिषदेत आरोप केल्यानंतर काही वेळातच शिंदे यांनी त्यास उत्तर देण्यासाठी पत्रपरिषद घेतली.
 
पदासाठी स्वतःचे पायपुसणे करून घेतले
 
 
महायुतीतील मंत्र्यांवरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मुख्यमंत्री कारवाई करत नसल्याने, उद्धव ठाकरे यांनी ’पांघरूण खाते’ तयार करण्याचा उपहासात्मक सल्ला दिला होता. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचे पायपुसणे करून घेतले आणि विरोधातील पक्षांसोबत हातमिळवणी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामावर बोट ठेवण्याचा मुळीच अधिकार नाही. याशिवाय मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बुके घेऊन का जाता?
 
 
उद्धव ठाकरेंचा बॅलन्स गेला
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलणे हे सुध्दा एक मोठी शोकांतिका आहे. उद्धव ठाकरे यांचा बॅलन्स गेलेला दिसून येत आहे. कोणताही संबंध नसलेल्या गोष्टी ते बोलू लागले विधानसभेत क्रमांक दोनचा पक्ष आज मतदारांनी शेवटच्या नंबरवर बसवले आहे. मी होतो तेव्हाही हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत असे म्हणत होते. घटनाबाह्य हा शब्द त्यांच्या आवडीचा विषय दिसतोय. त्यांच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. जेव्हा आपण समोरच्याकडे बोट दाखवतो तेव्हा तीन बोटे आपल्याकडे असतात. मुळात शेतकर्‍यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री झाला त्यांना पचनी पडले नाही. त्यातूनच ही पोटदुखी कायम असल्याचे दिसून येते.
 
२१०० रुपयांचा निर्णय योग्य वेळी
 
 
शिंदे पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे निवडणूक जिंकल्यावर यंत्रणा चांगल्या मानतात, तर निवडणूक हरल्यावर त्यांना वाईट ठरवतात. ईव्हीएम, मतदार यादी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या सर्वांवर ठाकरे आक्षेप घेतात. लाडकी बहीण योजना आघाडीने बंद करण्याचा प्रयत्न केला, तरी ती सुरू राहील आणि २१०० रुपयांचा निर्णय योग्य वेळी पूर्ण केला जाईल असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.