नागपूर,
devendra-fadnavis : बजेरियातील एम्प्रेस मिलच्या 2.80 एकर जागेवर नवनिर्मित वंदे मातरम उद्यानाचे लोकार्पण उद्या शनिवारी सायंकाळी 6 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे प्रामुख्याने उपस्थित राहतील. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाèया 21 परमवीर चक्र विजेत्यांना हे उद्यान समर्पित आहे. दिल्लीस्थित इंडिया गेटची प्रतिकृती या उद्यानाचे प्रवेश द्वार असून त्यामागे अमर जवान ज्योतीची प्रतिकृती आहे. अडीचशे नागरिक बसू शकतील एवढे खुले थिएटर असून भिंतीवर हुतात्म्यांची नावे कोरली आहेत. हिंदुस्थानी लाल सेनेची स्थापना, कारणे, इतिहास व त्यास सहकार्य करणाèयांची नावेही आहेत. याशिवाय या उद्यानात 21 परमवीर चक्र विजेत्यांची म्युरल्स, त्या खाली त्यांची चरित्रे व त्यामागे काचेचे बनलेले बुरशी व धूळविरोधी भित्तीचित्रे आहेत. शूर सैनिकांनी त्यांचे शौर्य दाखवलेल्या युद्धभूमीचे चित्रण त्यात आहे. भविष्यातीलपरमवीर चक्र मिळेल त्या 5 सैनिकांसाठी जागा रिक्त ठेवण्यात आली आहे.
या बागेत भारतीय सैन्याने वापरलेला एक रणगाडा, एक तोफ व एक विमान बसवण्याची योजना आहे. एम्प्रेस मिलच्या जुन्या चिमणीचे बळकटीकरण करून त्यावर लेसर शो आयोजित करण्याची आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी 10 कोटी रुपये तरतूद केली आहे. या लेसर शोमध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी भारतीय सैन्यात दिलेल्या योगदानाचे दर्शन घडवले जाईल.
रस्ते बांधणीसाठी तोडण्यात आलेल्या 480 झाडांसा मियां वाकी पद्धतीने बागेत 1,800 झाडे लावण्यात आली आहेत, जी सर्व 5 फुटांपेक्षा जास्त उंच झाली आहेत. ही सर्व पारंपरिक भारतीय झाडे आहेत. या उद्यानात हिरवेगार जिम व आधुनिक क्रीडा उपकरणे, व्यायाम उपकरणांनी सुसज्ज मुलांसाठी स्वतंत्र खेळाचे क्षेत्र आहे. तेथे खास पीडीएम फ्लोअरिंग बसवले जात आहे. दीड कि.मी.चा वॉकिंग ट्रॅक आहे. वास्तुविशारद प्रियदर्शन नागपूरकर आहेत. त्यांच्यासह पवन तिवारी, वैभव बावनकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.