‘अभाव ते प्रभाव’ संशोधनातूनच समाजपरिवर्तन

13 Dec 2025 17:48:13
नागपूर,
Abhav to Prabhav research समाजाच्या गरजांशी थेट नाते सांगणारे आणि ‘अभाव ते प्रभाव’ या दिशेने जाणारे संशोधन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांनी केले. विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. ही स्पर्धा ११ व १२ डिसेंबर रोजी अंजुमन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, नागपूर येथे पार पडली.
 

Abhav to Prabhav research 
या स्पर्धेतून परभणी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी सर्वोत्कृष्ट ४८ संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात आली. यावेळी अविष्कार सेलचे अध्यक्ष डॉ. निर्भय संचेती, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ, अविष्कार कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संजय ढोबळे, समन्वयक डॉ. प्रकाश ईटनकर, अंजुमन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉ. शकील सत्तार, प्राचार्य डॉ. के. एस. जकीउद्दीन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कुलगुरू डॉ. क्षीरसागर यांनी ग्रामीण व दुर्लक्षित घटकांच्या गरजांवर आधारित संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी यंदा अविष्कार स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले. डॉ. शकील सत्तार यांनी विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची जिज्ञासा वाढविण्यासाठी अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. नागपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांतील एकूण १०५ स्पर्धक या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यातून सहा गटांतील सर्वोत्कृष्ट ४८ स्पर्धकांची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून स्पर्धेचा समारोप करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0