मुंबई,
Ajit Pawar's criticism महाराष्ट्रात चांदा ते बांदा बिबट्यांचा हैदोस सुरू आहे. राज्यातील विविध भागांत दररोज बिबट्याचे हल्ले होत असून अनेक ठिकाणी प्राणघातक घटना घडत आहेत. वनमंत्री गणेश नाईक यांनी या संकटावर मात करण्यासाठी जंगलात एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. हा निर्णय प्राणीमित्रांच्या दृष्टीने भक्ष्य उपलब्ध करून देण्याच्या हेतूने घेण्यात आला, तसेच नागरिकांना बिबट्यांपासून सुरक्षित ठेवण्याचा उद्देशही त्यामागे होता. परंतु, हा निर्णय अनौपचारिक चर्चा दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हास्यास्पद असल्याचे एका वाक्यात स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, राज्यातील बिबट्यांची संख्या दोन हजारापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, मात्र वनताराकडून प्रत्यक्षात ५० बिबट्यांपेक्षा अधिक घेता येत नाहीत. त्यामुळे जंगलात एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय तर्कसंगत नाही. तसेच बिबट्यांच्या नसबंदीवर बोलताना त्यांनी सांगितले की, नसबंदीचे परिणाम दिसण्यासाठी काही वर्षांचा कालावधी लागू शकतो.
दरम्यान, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, पुणे या जिल्ह्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की हिंस्त्र प्राण्यांना भक्ष्य उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्यांसाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग लावून सोडण्याचा विचार आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, वनखात्याने सोडलेल्या शेळ्या-बकऱ्यांचे रक्षण करावे. गणेश नाईक यांनी सांगितले की, राज्यातील ज्या भागांमध्ये बिबटे जास्त आहेत, तिथील बिबटे आफ्रिकेत पाठवण्याचा विचारही सुरू आहे. आफ्रिकेत वाघ आणि सिंह आहेत, पण बिबटे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे तिथे पाठवण्याचा प्रस्ताव केंद्रीय वनखात्याला पाठवला जाईल, असा त्यांनी उल्लेख केला.