अमरावती पोलिस आयुक्तांची तडकाफडकी बदली

13 Dec 2025 19:58:40
अमरावती, 
amravati-police-commissioner : येथील पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या बदलीचे आदेश धडकले. सहा महिन्यापूर्वीच त्यांनी आयुक्तपदाची सूत्रे स्विकारली होती. त्यांच्या जागेवर राकेश ओला हे नवे पोलिस आयुक्त म्हणून कामकाज सांभाळतील.
 

amt 
 
राकेश ओला हे बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त कार्यरत आहे. लवकरच ते अमरावती पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारतील. अरविंद चावरिया यांची अचानक बदली का झाली, याची चर्चा शहरात जोरात सुरू झाली आहे. त्यांच्या बदलीसाठी अनेक मुद्दे कारणीभूत ठरले आहे. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहरात लवकरच महापालिका निवडणूक होणार आहे. या निवडणुका शांततेच्या वातावरणात करण्यासाठी गुन्हेगारीवर लगाम लावणे आवश्यक आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. सर्व स्थितीचा आढावा घेऊनच चावरिया यांची बदली झाल्याची माहिती आहे.
 
 
नवे आयुक्त राकेश ओला हे २०१२ बॅचचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांनी आतापर्यंत श्रीरामपूर, मालेगाव, नागपूर येथे पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरचे अधीक्षक म्हणून काम सांभाळले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे बृहन्मुंबईचे पोलिस उपायुक्त जबाबदारी आली होती. अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा त्यांनी यशस्वी तपास केला असल्याचे सांगण्यात येत आहे. अमरावतीत ते कसा प्रभाव पाडतात हे लवकरच कळेल.
Powered By Sangraha 9.0