आदिवासी भागात कुपोषणाची स्थिती जैसे थे

13 Dec 2025 20:14:02
अमरावती,
sanjay-khodke : राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांमध्ये बालमृत्यू , मातामृत्यू रोखण्यासाठी व हे जिल्हे कुपोषणमुक्त करण्यासाठी शासनाच्या वतीने कोट्यावधींचा निधी खर्च करूनही कुपोषणाची समस्या जैसे थे आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात तर कुपोषणाचा वाढता आलेख चिंतेची बाब असून तेथे कार्यरत यंत्रणा कुचकामी ठरतांना दिसत आहे. शासनानेही याबाबत चिंता व्यक्त केली असली तरी मेळघाटात जो काही अनागोंदी कारभार सुरू आहे, याला आळा बसण्यासाठी शासनाने लक्ष घालण्याची नितांत गरज असून आरोग्य विभाग , महिला व बालविकास विभाग तसेच आदिवासी विभागाने संयुक्त बैठक घेऊन उपाययोजना राबविण्याची सूचना आ. संजय खोडके यांनी केली.
 
 
k
 
नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजामध्ये कुपोषण निर्मूलनाच्या संदर्भातील अर्धा तास झालेल्या चर्चेमध्ये आ. संजय खोडके यांनी सहभागी होऊन अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील कुपोषण तसेच बालमृत्यू व मातामृत्यू संदर्भातील विदारक स्थिती संदर्भात शासनाचे लक्ष वेधले. यासाठी एका माहितीच्या अधिकारातून आलेल्या अहवालाचा हवाला देत आ. संजय खोडके म्हणाले की, राज्यात वर्ष २०२० पासून बालमृत्यू हे ८४ हजार ३०४ एवढे झाले. गर्भामध्ये मृत्यू ७० हजार ४५४ तसेच मातामृत्यू ६,५७४ इतके झाले आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागात यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर महिन्याच्या कालावधीमध्ये बालमृत्यू ९७, गर्भातील मृत्यू ३० तसेच मातामृत्यू ३ इतके झाले आहेत. यामागचे कारण त्यांना पोषण आहार व आरोग्याच्या सुविधा मिळत नसल्याने हे प्रमाण वाढतच जात असल्याचे सांगून आ. संजय खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मेळघाटात ज्या काही एनजीओ काम करतात, किंवा पोषण आहार पुरवठ्याच्या बाबतीत ज्या काही एजन्सीज काम करतात, त्यांच्या कामात देखील प्रचंड अनागोंदी सुरू असल्याचे चित्र असून ही व्यवस्था कधी बदलविणार, असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
 
 
मेळघाटातील आरोग्याच्या समस्येचे एक कारण अंधश्रद्धा सुद्धा आहे. तेथील लोक रुग्णालयांकडे न जातात त्या भागातील जो एखादा जाणकार आहे, त्याच्याकडे जाऊन त्याच्या सल्याने उपचार करतात. त्यामुळे अश्या प्रकारांना आळा बसणेही आवश्यक असून याबाबत प्रभावी जनजागृती करून अंधश्रद्धा निर्मूलन करण्याची सूचना सुद्धा आ. संजय खोडके यांनी केली.
Powered By Sangraha 9.0