अलीगढ,
Controversy over Red Fort, Qutub Minar अलीगढ जिल्ह्यातून एक अजब आणि धक्कादायक प्रकरण समोर आले असून त्यामुळे प्रशासनासह पोलिस यंत्रणेतही खळबळ उडाली आहे. अलीगढ शहरातील बन्ना देवी परिसरात राहणाऱ्या एका प्लंबरने थेट पंतप्रधान कार्यालयाच्याआयजीआरएस पोर्टलवर तक्रार दाखल करत दिल्लीतील लाल किल्ला आणि कुतुबमिनार हे आपलेच असल्याचा दावा केला आहे. स्वतःला मुघल सम्राट अकबरचा वारस असल्याचे सांगत, या ऐतिहासिक स्मारकांचा ताबा आपल्याला द्यावा किंवा थेट पंतप्रधानांची भेट घडवून द्यावी, अशी मागणी त्याने केली आहे.
या व्यक्तीने सप्टेंबर आणि नोव्हेंबर महिन्यात आयजीआरएस पोर्टलवर दोन हस्तलिखित पत्रे पाठवली होती. या पत्रांमध्ये लाल किल्ला आणि कुतुबमिनार ही आपली खाजगी मालमत्ता असल्याचा दावा करत, ती रिकामी करून आपल्याकडे सुपूर्द करण्यात यावीत किंवा त्याबदल्यात मोठी रक्कम देण्यात यावी, असे नमूद करण्यात आले होते. याशिवाय, आपल्याला जीवाला धोका असल्याचा आरोपही त्याने केला असून, देशातील दहा हून अधिक प्रमुख विरोधी नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याचे त्याने पत्रात लिहिले आहे.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पंतप्रधान कार्यालयाने ही तक्रार थेट अलीगढ पोलिसांकडे चौकशीसाठी पाठवली. त्यानंतर बन्ना देवी पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद घेण्यात आली आणि चौकशी सुरू करण्यात आली. देशाच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित आणि थेट PMOशी निगडित असल्याने या प्रकरणाने पोलिस विभागातही मोठी खळबळ उडवली. या प्रकरणाचा तपास सीओ-II कमलेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी तक्रारदार अकबर याला चौकशीसाठी बोलावले असता तो व्यवसायाने प्लंबर असल्याचे आणि याच परिसरात राहत असल्याचे निष्पन्न झाले. ११ डिसेंबर रोजी त्याची सविस्तर चौकशी करण्यात आली, मात्र त्याच्या दाव्यांना पुष्टी देणारे कोणतेही कागदपत्र किंवा पुरावा तो सादर करू शकला नाही. तरीही तो आपल्या दाव्यावर ठाम असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, अकबरने ज्या लोकवाणी केंद्रामार्फत आयजीआरएस पोर्टलवर तक्रार दाखल केली होती, त्या केंद्राच्या ऑपरेटरलाही चौकशीसाठी बोलावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. तक्रार नोंदवताना नेमकी कोणती प्रक्रिया वापरण्यात आली, तसेच त्यात काही संशयास्पद बाबी आहेत का, याचा तपास केला जाणार आहे. सीओ-II कमलेश कुमार यांनी सांगितले की सध्या सर्व संबंधितांचे जबाब नोंदवले जात असून, तक्रारदाराच्या दाव्यांमागील उद्देश आणि मानसिक स्थितीचीही तपासणी केली जात आहे. सर्व तथ्यांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.