वेध
st corporations आजारापेक्षा उपचार भारी ठरू नये, असे म्हणण्याची स्थिती एस टी महामंडळांच्या राज्यातील विविध आगारांवर आली आहे. राज्य परिवहन महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एस टी महामंडळाच्या ताफ्यात ईलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेस आगारांसाठी खर्चिक ठरत आहेत.
शिवाई ही ई-बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहेत. आजपर्यंत 550 पेक्षा जास्त बसेस राज्यातील विविध आगारात पोहचल्या आहेत. या बसचे 74 रु. प्रतिकिलोमिटर या आगारांना भरावे लागणार आहेत. या बसेस लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी धावणार आहेत. एकदा चार्ज केल्यावर 30 कि. मी. ही बस धावणार आहे. त्यामुळे इंधनावर डिझेलच्या तुलनेत या बसचा खर्च अतिशय लक्षणीयरित्या कमी होणार आहे. सर्व्हिसिंगचा खर्च देखल कमी होणार आहे. त्यामुळे आर्थिक बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे.
एका बसला पूर्ण चार्जींगसाठी किमान 3 तास लागणार आहेत. सध्या बुलढाणा जिल्ह्यातील सात पैकी 4 आगारांना टप्प्याटप्प्याने 150 ई-बसेस मिळणार आहेत. मात्र, या बसचे प्रवासी भाडे वर्तमान बसेसपेक्षा जास्त असल्याने ते प्रवाशांना परवडणारे नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. सध्या खामगाव-अकोला धावणाèया लालपरीचे तिकीट 91 रु. आहे. तर, 44 आसनी शिवाई ई-बसचे तिकीट 144 रु. व 35 आसनी ई-बसचे तिकीट 131 रु. आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी या बसने प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळे एस टी आगारांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे अनेक आगारप्रमुखांनी या बसेस घेण्यास नापसंती दर्शविण्याचा प्रयत्न केला. पण, महामंडळाचा निर्णय असल्याने त्यांना या बसेस आगारात दाखल करून घ्याव्या लागल्या किंवा लागत आहेत. तसेच, बुलढाणा जिल्ह्याचा विचार करता ई-बस चार्जींगसाठी आवश्यक सुविधा नाही. एका खाजगी कंपनीला बुलढाणा, चिखली, मलकापूर, खामगाव आणि शेगाव येथील आगारांमध्ये चार्जींग सेंटर उभारण्याचे कंत्राट देण्यात आले असल्याची माहिती आहे. बुलढाणा व खामगाव येथील काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र, ही सुविधा अजून कार्यान्वीत न झाल्याने ई-बस सेवा सुरू होण्यास आणखी विलंब लागणार आहे. ई-बस सेवेतील इतर अनेक तांत्रिक अडचणींसोबतच प्रवास भाडे ही देखील महत्त्वाची समस्या आहे. सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल, एवढे भाडे आकारण्यात यावे, अशी प्रवाशांची मागणी आहे. कारण, साध्या बसने प्रवाशांना सवलतीच्या दरातील प्रवास भाड्याचा देखील लाभ मिळतो. महिलांना अर्धे तिकीट आकारले जाते. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलतीला लाभ मिळतो. याशिवाय अपंग व इतर प्रवास सवलतधारकांना या बसने प्रवास करता येईल की नाही, ते अजून निश्चित नाही. सरकारने प्रवास सवलत दिल्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवाशांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. प्रवासी उचलण्यासाठी सध्या सुरू असलेल्या बसेसची संख्या कमी पडत आहे. त्यातही नादुरूस्त बसेसची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. ई-बसेस लवकरात लवकर सुरू झाल्यास जुन्या बसेसवरील ताण कमी होईल. तसेच, ई-बसेसच्या प्रवास भाड्यात काही कपात केल्यास सर्वसमान्य प्रवासी त्या बसेसने प्रवास करण्यास नक्कीच पसंती देतील. यापूर्वी महामंडळाने शिवशाही ही बससेवा सुरू केली होती. या बसचे तिकीटही सुरूवातीला जास्त होते. प्रवाशांना कोणतीही सवलत या बसमध्ये मिळत नव्हती. त्यामुळे सुरूवातीला या बस सेवेला कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रवास भाडे कमी केल्यावर शिवशाहीने देखील प्रवास करण्यास प्रवाशांनी पसंती दिली. वातानुकूलीत प्रवासाचा आनंद प्रवाशांना मिळाला आणि मिळत आहे. तसेच, शिवाई या ई-बस सेवेचे देखील आहे. या बसचे प्रवासी भाडे कमी करून राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना दिलासा द्यावा. तसेच, राज्यातील सर्व आगारात ई-बसेस व चार्जींग स्थानकांची उभारणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.