कृषी क्षेत्र - प्रक्रिया उद्योगांचे धोरण तयार करणार

13 Dec 2025 20:41:19
नागपूर, 
devendra-fadnavis : कृषी क्षेत्राच्या विकासासाठी शेतकर्‍यांचा क्षमता विकास करून प्रक्रिया उद्योगासह इतर संलग्न क्षेत्राशी त्याची बृहद जोडणी करण्यात येईल. यासाठी आवश्यक धोरण तयार करण्यात येईल व निधी राज्य शासनाकडून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
 
devendra-fadnvis-centre-point
 
रामदासपेठ येथील सेंटर पॉईंट हॉटेलमध्ये कॉन्फेड्रेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्यावतीने भविष्याभिमुख महाराष्ट्रासाठी कृषी क्षेत्राचे कृषि उद्योगात रूपांतर : मूल्यवर्धन, नवोन्मेष व गुंतवणूक विषयावर आयोजित फूड कॉनक्लेवचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषी राज्यमंत्री अ‍ॅड आशिष जयस्वाल, कृषी अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन, सीआयआयचे अध्यक्ष बुर्जीस गोदरेज आदी उपस्थित होते.
 
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, वातावरणातील बदलामुळे शेतीमध्ये झालेले बदल हे या क्षेत्रासमोरील मोठे आव्हान आहे. यासंदर्भात उचित उपाययोजना करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कृषी क्षेत्रात मुल्यवर्धन करून शेतकर्‍यांना जास्तीत-जास्त फायदा दिशेने शासनाचे प्रयत्न आहेत. यासोबतच अन्न प्रक्रिया उद्योगाशी या क्षेत्राला जोडण्याचे कार्यही सुरू आहे. परिणामी शेतकर्‍यांना चांगला मोबदला मिळत आहे. कृषी संबंधित उर्वरित क्षेत्रामध्ये प्रक्रिया पद्धती रूजवून उचित परिसंस्था उभारण्याच्या दिशेनेही प्रयत्न सुरू आहेत.
 
जागतिक बँकेच्या मदतीने राज्यात ‘स्मार्ट’ आणि ‘मॅग्नेट’ या महत्वाकांक्षी प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे. देशात सर्वात शेतकरी उत्पादक असणार्‍या महाराष्ट्र राज्यात या दोन्ही प्रकल्पांना केंद्र व राज्याच्या विविध योजनांद्वारे मदत करून कृषी क्षेत्र बळकट करण्यासाठी शासन कार्य करीत आहे. कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अन्बलगन यांनी ’महाराष्ट्र द इंजिन पॉवरिंग विकसित भारत २०४७’ सादरीकरण केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कृषी विभागाच्या माहिती पुस्तिकेचे विमोचन झाले.
Powered By Sangraha 9.0