‘डीएचओ’ मानांकनात चंद्रपूर राज्यात तिसरा, तर विभागात पहिला

13 Dec 2025 19:22:05
चंद्रपूर,
dho-rating : दर महिन्याला राज्यस्तरावर विविध आरोग्य कार्यक्रमांचे निर्देशांक उदिष्टे पूर्ण केल्यामुळे आरोग्य मानद गुणानुसार श्रेणी दिली जाते. त्यात ऑक्टोंबर महिन्याच्या मानांकनात चंद्रपूर ‘डीएचओ’च्या कामगिरीने भरारी घेतली आहे. राज्यात चंद्रपूर तिसर्‍या स्थानी, तर विभागाच्या परिमंडळात पहिल्या स्थानावर आहे.
 
 
DHO
 
राज्यात आरोग्य विभागाकडून विविध उपक्रम व अभियान तसेच आरोग्य कार्यक्रम राबविण्यात येतात. त्यामध्ये माता बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्य, विविध लसीकरण, आरसीएच ऑनलाईन पोर्टल नोंदणी, क्षयरोग कार्यक्रम, आयुष्यमान भारत आरोग्य वर्धिनी अंतर्गत मोफत विविध तपासण्या अश्या नियमित आरोग्य उपक्रम व राष्ट्रीय आरोग्य उपक्रमाची जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्य यंत्रणेने अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे डीएचओ मानांकनात चंद्रपूर जिल्ह्याने भरारी घेतल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी सांगितले.
 
 
यादीतील गुण क्रमांकानुसार 63.30 गुणासह धाराशिव पहिल्या स्थानावर, 62.27 गुणासह अकोला दुसर्‍या स्थानावर, 59.15 गुणासह चंद्रपूर तिसर्‍या स्थानावर, 56.91 गुणासह गोंदिया चौथ्या आणि 56.25 गुणासह बुलढाणा पाचव्या क्रमांकावर आहे. विविध आरोग्य उपक्रमाच्या अंमलबजावणीच्या रँकिंगमध्ये मिळालेले स्थान हे आरोग्य विभागातील प्रत्येक घटकाने दिलेल्या योगदानामुळे आहे. उत्तम प्रथोमोपचारासह सर्व राष्ट्रीय आरोग्य उपक्रम यशस्वी राबविण्याचा आरोग्य विभागाचा कायम प्रयत्न राहणार आहे.
 
सांघिक कामगिरी ठरली महत्वाची
 
 
हे मानांकन चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी कार्यक्षेत्रात केलेल्या सांघिक कामगिरीमुळेच मिळाल्याचे डॉ. अशोक कटारे यांनी म्हटले आहे. सार्‍या चमूने गुणात्मक सेवा दिल्याने व त्या कामाचे अहवाल करणारे डाटा एन्ट्री ऑपरेटर, तालुकास्तरीय कर्मचारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व कार्यक्रम समन्वयक, जिल्हास्तरीय पर्यवेक्षक यांनीही उत्तम प्रकारे कामगिरी केली, असेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0