मुंबई,
Discontent in the Shinde camp महापालिका निवडणुका जवळ येत असतानाच महायुतीत जागा वाटपावरून तणाव निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमध्ये भाजप अधिक जागांची मागणी करत असताना, शिंदे गटाची शिवसेनाही अनेक जागांवर ठाम भूमिका घेत आहे. महापौरपदासह इतर महत्त्वाची पदे नेमकी कुणाकडे जाणार, यावर अद्याप एकमत झालेले नसल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या आमदारांची एक महत्त्वाची बैठक पार पडली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी काल रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. या बैठकीला जवळपास सर्व आमदार उपस्थित होते. बैठकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदाराशी स्वतंत्रपणे चर्चा केली. विकासकामांमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, तसेच निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे ठोस आश्वासन त्यांनी आमदारांना दिले. विरोधकांच्या, विशेषतः ठाकरे गटाच्या टीकेला केवळ वक्तव्यांनी नव्हे तर कामातून उत्तर द्या, असे स्पष्ट निर्देशही शिंदे यांनी यावेळी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापालिका निवडणुका या महायुती म्हणूनच लढवायच्या आहेत, त्यामुळे युतीची प्रतिमा मलिन होईल असे कोणतेही विधान किंवा वर्तन टाळावे, अशा स्पष्ट सूचना आमदारांना देण्यात आल्या. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका आमदारांनी बैठकीत मांडल्याचेही समजते. यामुळे आगामी काळात महायुतीत आंतरिक कुरबुरी वाढणार का, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
या बैठकीत महामंडळांच्या वाटपाचा मुद्दाही महत्त्वाने चर्चेत आला. गेल्या वर्षभरापासून महामंडळांचे वाटप रखडलेले असून, खातेवाटपात संधी न मिळालेल्या आमदारांचे पुनर्वसन महामंडळांवर करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. आमदारांनी महामंडळांचे वाटप लवकरात लवकर व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत लवकरच महामंडळांचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. ठाण्यातील या रात्रभर चाललेल्या बैठकीमुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत असून, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.