वॉशिंग्टन,
Jeffrey Epstein's new photos वॉशिंग्टनमध्ये पुन्हा एकदा कुप्रसिद्ध लैंगिक गुन्हेगार आणि सेक्स ट्रॅफिकर जेफ्री एपस्टाईन प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकन डेमोक्रॅटिक पक्षाच्या कायदेकर्त्यांनी यूएस हाऊस ओव्हरसाईट कमिटीसमोर एपस्टाईनचे काही नवे फोटो सार्वजनिक केले असून, या छायाचित्रांमध्ये अमेरिका आणि जगातील अनेक नामवंत राजकीय, व्यावसायिक आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती दिसत आहेत. हे फोटो एपस्टाईनच्या इस्टेटकडून रिपब्लिकन नेतृत्वाखालील समितीला सादर करण्यात आलेल्या दस्तऐवजांचा भाग आहेत.
एकूण १९ छायाचित्रांमध्ये अमेरिकेचे माजी व विद्यमान नेते, उद्योगपती आणि सेलिब्रिटींचा समावेश आहे. या फोटोंमध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, ट्रम्प यांचे माजी सल्लागार स्टीव्ह बॅनन, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, ब्रिटिश उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन, अभिनेता वुडी अॅलन, अर्थतज्ज्ञ लॅरी समर्स, प्रसिद्ध वकील अॅलन डेरशोविट्झ आणि ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांचाही उल्लेख आहे. काही छायाचित्रांमध्ये एपस्टाईन स्वतः दिसत नसला तरी त्याच्या मालमत्तांशी किंवा कार्यक्रमांशी संबंधित व्यक्ती या फोटोंमध्ये आढळतात.
एका फोटोमध्ये ट्रम्प यांच्या कार्टून प्रतिमेसह कंडोमचा एक वाडगा दिसतो, ज्यावर “ट्रम्प कंडोम $4.50” आणि “मी मोठा आहे!” असे शब्द लिहिलेले आहेत. दुसऱ्या छायाचित्रात ट्रम्प सहा महिलांसोबत दिसत असून त्या महिलांचे चेहरे अस्पष्ट करण्यात आले आहेत. आणखी एका फोटोमध्ये स्टीव्ह बॅनन एपस्टाईनच्या शेजारी उभे आहेत, तर एका छायाचित्रात बिल क्लिंटन घिसलेन मॅक्सवेलसोबत दिसतात. बिल गेट्स प्रिन्स अँड्र्यूसोबत उभे असल्याचेही एका फोटोमध्ये दाखवण्यात आले आहे. मात्र, समिती आणि डेमोक्रॅटिक कायदेकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की या छायाचित्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे लैंगिक गैरवर्तन दाखवलेले नाही किंवा अल्पवयीन मुलींच्या सहभागाचे कोणतेही संकेत नाहीत. केवळ एखाद्या फोटोमध्ये एखादी व्यक्ती दिसत असल्याने तिने गैरकृत्य केले असे गृहीत धरता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. या छायाचित्रांचे नेमके ठिकाण आणि काळ अद्याप स्पष्ट झालेला नाही.
हाऊस ओव्हरसाईट कमिटीने सांगितले की हे फोटो एपस्टाईनच्या इस्टेटने सादर केलेल्या हजारो कागदपत्रे, फोटो आणि व्हिडिओंपैकी एक भाग आहेत. समितीला पाठवलेल्या पत्रात एपस्टाईन इस्टेटच्या वकिलांनी स्पष्ट केले की १९९० ते २०१९ या कालावधीत एपस्टाईनच्या विविध मालमत्तांशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. काही सामग्रीमध्ये केवळ “नग्नता” मर्यादित स्वरूपात बदलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या नव्या फोटोंच्या प्रकाशनामुळे अमेरिकन राजकारणात आणि समाजात पुन्हा एकदा एपस्टाईन प्रकरणावर चर्चा आणि वादंग सुरू झाले असून, या प्रकरणाशी संबंधित आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.