मुंबई,
Kis Kisko Pyaar Karoon 2 कॉमेडियन ते अभिनेता असा यशस्वी प्रवास करणाऱ्या कपिल शर्माची बहुप्रतीक्षित बॉलिवूड फिल्म किस किस को प्यार करूं 2 अखेर प्रदर्शित झाली आहे. पहिल्या भागानंतर तब्बल दहा वर्षांनी आलेल्या या सिनेमाकडून प्रेक्षक आणि निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपटगृहात रिलीज होताच समोर आलेले बॉक्स ऑफिसचे आकडे या अपेक्षांवर पाणी फेरणारे ठरत आहेत.
२०१५ साली प्रदर्शित झालेला किस किस को प्यार करूं हा कपिल शर्माचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा होता. त्या काळात कॉमेडी नाइट्स विद कपिल या कार्यक्रमामुळे कपिल शर्माची लोकप्रियता शिखरावर होती. देशातच नव्हे तर परदेशातही कपिलचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. त्याच लोकप्रियतेचा फायदा पहिल्या चित्रपटाला मिळाला आणि या सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुमारे १० कोटी रुपयांची घवघवीत कमाई केली होती.
मात्र, आता दहा वर्षांनंतर आलेल्या किस किस को प्यार करूं 2 बाबत चित्र वेगळे दिसत आहे. चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये अपेक्षित उत्साह आणि क्रेझ जाणवत नाही. बॉक्स ऑफिसवरील सुरुवातीचे आकडेही सिनेमासाठी फारसे आशादायक नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा अंदाजे बजेट सुमारे ३० कोटी रुपये आहे. त्या तुलनेत पहिल्या दिवशीची कमाई अत्यंत कमी राहिली आहे.व्यापार तज्ज्ञांच्या अहवालानुसार, किस किस को प्यार करूं 2 ने ओपनिंग डे ला केवळ १.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. म्हणजेच पहिल्याच दिवशी हा सिनेमा २ कोटी रुपयांचा टप्पाही गाठू शकलेला नाही. रिलीजच्या दुसऱ्या दिवशीही कमाईत फारशी वाढ न झाल्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे निर्मात्यांची चिंता वाढली आहे.पहिल्या भागाच्या तुलनेत हा दुसरा भाग बॉक्स ऑफिसवर फिका पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. बदललेली प्रेक्षकांची आवड, वाढलेली स्पर्धा आणि कंटेंटबाबतच्या अपेक्षा याचा फटका सिनेमाला बसत असल्याचे मानले जात आहे. आता वीकेंडला मिळणारा प्रतिसाद आणि प्रेक्षकांकडून होणारी तोंडी प्रसिद्धी यावरच या सिनेमाचे पुढील बॉक्स ऑफिस भवितव्य अवलंबून असणार आहे.