कर्मचार्‍यांच्या आंदोलनाची दखल घ्या

13 Dec 2025 17:28:49
सिंदखेडराजा,
Manoj Kayande सिंदखेड राजा मतदारसंघाचे आ. मनोज कायंदे यांनी शासकीय आणि निमशासकीयकर्मचार्‍यांच्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा अतिशय पोटतिडकीने मांडला. गेल्या १० वर्षांपासून कर्मचारी त्रास सहन करत आहेत, त्यांच्यावर अन्याय होत आहे, अशा शब्दांत त्यांनी सभागृहात कर्मचार्‍यांची बाजू मांडली.
 

Manoj Kayande 
विधानसभेत बोलताना आ. कायंदे म्हणाले की, केवळ जाहिरातीची तारीख किंवा जॉइनिंगची तारीख या तांत्रिक कारणांवरून कर्मचार्‍यांना लाभापासून वंचित ठेवणे चुकीचे आहे. तारीख एक असली तरीही कर्मचार्‍यांवर अन्याय होत असेल, तर तो दूर झाला पाहिजे. सर्व घटकांसाठी आग्रही मागणी यावेळी बोलताना त्यांनी पोलीस पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, धोबी समाज आणि इतर सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचार्‍यांचा उल्लेख केला. या सर्व घटकांवर होणारा अन्याय आपल्या माध्यमातून दूर झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कर्मचार्‍यांच्या भावना व्यक्त करताना आ. मनोज कायंदे यांनी शासनाला स्पष्ट शब्दांत विनंती केली की, ’कर्मचार्‍यांच्या उपोषणाला आणि त्यांच्या आंदोलनाला गांभीर्याने घेणे खूप गरजेचे आहे.’ कर्मचार्‍यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी भर सभागृहात केली. हिवाळी अधिवेशनात जुन्या पेन्शन योजनेबाबत आमदार कायंदे यांनी मांडलेल्या आक्रमक भूमिकेचे कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.
Powered By Sangraha 9.0