तीन माओवाद्यांचे शस्त्रासह गाेंंदिया पोलिसांसमक्ष आत्मसमर्पण

13 Dec 2025 19:52:39
गोंदिया, 
maoists-surrender : जिल्हा पोलिस दलासमक्ष दर्रेकसा एरिया कमांडरसह दोन एसीएम माओवाद्यांनी स्वतःजवळली शस्त्रासह आज, १३ डिसेंबर रोजी आत्मसमर्पण केले. रोशन उर्फ मारा इरिया वेडजा (३५, रा.मेंढरी जि.बिजापूर), सुभाष उर्फ पोज्जा बंडू रव्वारा (२६, देरापल्ली जि.बिजापूर) व रतन उर्फ मनकू ओमा पोयम पोयाम (२५, रा.रेखापाल जि.नारायनपूर) असे आत्मसमर्पन केलेल्या माओवाद्यांची नावे आहेत.
 
 
gondia
 
 
 
राज्य शासनाने २००५ पासून जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत जिल्हा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. २८ नोव्हेंबर रोजी एमएमएसी झोनमधील स्पेशल झोनल कमेटी मेंबर विकास उर्फ अनिल उर्फ नवज्योत नागपुरे उर्फ रमेश सायत्रा भास्कर लिंगय्या रामस्वामी याच्यासह ११ जहाल माओवाद्यांनी गोंदिया पोलिस दलासमोर आत्मसर्मपण केले होते. दर्रेकसा एरिया कमेटीचे उर्वरित काही माओवादी सदस्य आत्मसमर्पण होणे बाकी होते. त्या अनुषंगाने गोंदिया पोलिस दलाचे उर्वरित माओवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्याचे फलीत म्हणजे, १३ डिसेंबर रोजी एमएमसी झोन मधील दर्रेकसा एरिया कमेटी कमांडर रोशन याच्यासह दोन एसीएम सदस्यांनी जिल्हा पोलिसासमक्ष आत्मसमर्पण केले. यात राज्य शासनाने रोशनवर ८ लाख रूपये, सुभाष व रतनवर प्रत्येकी ६ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. जिल्हा पोलिस दलासमोर रोशनने एसएलआर शस्त्र, दोन मॅगझीन व २५ राऊंडसह, सुभाषने एसएलआर शस्त्र, २ मॅगझीन व २३ राऊंडसह तर रतनने ८ एमएम शस्त्र, १ मॅगझीन व १५ राऊंडसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना राज्य शासनाच्या आत्मसमर्पण योजनेतंर्गत योग्य ते पुर्नवसन करण्यात येत असून नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या नक्षलवाद्यांना शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0