नागपूर,
Sanjay Shirsat : दीक्षाभूमी जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान असल्याने येथे होणार्या सर्व कामांचे नियोजन अत्यंत संवेदनशीलतेने, शास्त्रीय पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता पूर्ण दक्षता घेऊन आणि मुख्यमंत्री यांच्या पूर्वपरवानगीने करावीत, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा संजय शिरसाट यांनी नियोजन भवन येथे घेतला. दीक्षाभूमीतील सुशोभीकरण, सुविधा पायाभूत विकासकामे ही जागतिक दर्जाची असावीत, जेणेकरून देश-विदेशातून येणार्या अनुयायांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अनुसरून विकासकामे करताना परंपरा, श्रद्धा आणि संवेदनशीलतेचा आदर अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले की, कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ आणि हितधारकांशी सखोल चर्चा नियोजन करावे. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो.ना.बागुल तसेच सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.