सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या साखळी उपोषणाला यश

13 Dec 2025 20:15:27
नागपूर,
winter-session : सुरक्षा रक्षक कर्मचारी संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या साखळी उपोषणाला यश मिळाले आहे. सोमवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सुरू झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी संघटन प्रभारी तथा भामसं विदर्भ प्रदेश महामंत्री गजानन गटलेवार, मार्गदर्शक शंकरराव पहाडे, जिल्हाध्यक्ष शिवराज सूर्यवंशी, जिल्हा मंत्री हर्षल ठोंबरे, कार्याध्यक्ष सतिश दुनेवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 
 
k
 
उपोषणस्थळी अनेक मान्यवरांनी भेट देत नागपूर व चंद्रपूर मंडळातील प्रलंबित प्रश्नांबाबत नाराजी व्यक्त केली. नागपूर दक्षिणचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांनी या विषयावर स्वतः कामगार मंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांनीही भेट देऊन प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेधत विधानसभेत लक्षवेधी सूचना क्रमांक १ हजार ८१२ सादर केल्याचे सांगत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे वचन दिले. उपोषणाच्या चौथ्या दिवशी, ११ डिसेंबर रोजी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधिमंडळात संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व मागण्यांवर सकारात्मक भूमिका दर्शविली. येत्या १५ ते २० दिवसांत मंत्रालय, मुंबई येथे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांसह तातडीची बैठक घेऊन सर्व विषयांना मान्यता देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.समारोपीय भाषणात संघटनेचे उपमहामंत्री तीर्थराज बडमे यांनी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली येथील पदाधिकारी व सभासदांचे तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. साखळी उपोषणाच्या यशामुळे सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0