बोंडअळीच्या आक्रमणाने कापूस उत्पादक हादरला

13 Dec 2025 19:32:11
वर्धा, 
bollworm-cotton-growers : यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीनने दगा दिल्यानंतर कापसाचे उत्पन्न होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, कपाशीच्या उत्पन्नात प्रचंड घट आली असतानाच आता बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे कापूस उत्पादक चांगलाच हादरला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
 
 
 
k
 
 
 
खरीप हंगामात शेतकर्‍यांनी सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली. निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक हाती लागले नाही. त्याशिवाय सोयाबीनवर येलो मोझाक आणि चारकोल या रोगाने सोयाबीनला ग्रासले. त्यामुळे सोयाबीनची उतारी अत्यंत कमी प्रमाणात झाली. सोयाबीनच्या अत्यल्प उत्पन्नामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असतानाच आता कपाशीवर शेतकर्‍यांची भीस्त होती. मात्र कपाशीला वातावरणातील बदलावामुळे आणि अतिवृष्टीमुळे पर्‍हाटीला बोंड कमी आणि पालाच अधिक दिसून येत होता. त्यामुळे कापसाचे उत्पन्न कमी प्रमाणात झाल्याचा अंदाज असतानाच अलीकडे उरल्या सुरल्या बोंडअळीने आक्रमण केल्यामुळे आता कापसाच्या उत्पन्नाची आशा धूसर झाली आहे. बोंडअळीमुळे कापसाचे अर्धेअधिक बोंडाचा कापूस खराब निघतो. शिवाय काही बोंडातून कापूस ही निघत नाही. त्यामुळे सहाजिकच कापसाच्या उत्पादनात घट येते. इतकेच नव्हे तर कापूस बोंड खराब होत असल्यामुळे कापसाच्या भावातही फरक पडतो. त्याशिवाय अत्यल्प भावही मिळतो. परिणामी शेतकर्‍यांचे नुकसान होते. आधीच शेतकरी आर्थिक संकटात असताना पुन्हा बोंडअळीने हल्ला चढवल्यामुळे कापूस उत्पादक चांगलाच हतबल झाला आहे. कापसाला भाव नाही, हमीभावातही खरेदी करण्यासाठी शासनाचे किचकट नियम शेतकर्‍यांना वेठीस धरत आहे.
Powered By Sangraha 9.0