वर्धा,
bor-and-dham-projects : वर्धा पाटबंधारे विभागांतर्गत येणार्या बोर आणि धाम प्रकल्पाच्या वितरण प्रणाली आणि दुरुस्तीच्या ५५० कोटींच्या निविदा वेगवेगळ्या काढा, अशी मागणी महाराष्ट्र अभियंता संघटनेने केली आहे.
जिल्ह्यातील बोर प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाले आहे. तर धाम प्रकल्प पूर्ण होऊन बराच कालावधी झाला आहे. त्यामुळे राज्य शासनाने धाम व बोर प्रकल्पाच्या विशेष दुरुस्तीकरिता सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जवळपास ४५० कोटींची प्रशासकीय मान्यता दिली. परंतु, बोर प्रकल्पाकरिता ३०० कोटींची आणि धाम प्रकल्पाकरिता २५० कोटींची एकच निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकच निविदा काढल्यामुळे अनेक वर्षे विखुरलेले काम पूर्ण होऊ शकत नाही. तर वाढीव सिंचनाचे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकरी सिंचनाच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
त्यामुळे विखुरलेल्या लहान कामाचे एकत्रिकरण करून एकच निविदा काढण्यात येऊ नये. पाटबंधारे विभागामार्फत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व अनेक जिल्ह्यात महाराष्ट्र इरिगेशन अम्प्रुमेंट या योजनेंतर्गत वेगवेगळ्या तांत्रिक मंजुरी असलेल्या कामाची ५० कोटींची निविदा वर्धा पाटबंधारे विभाग, गडचिरेाली पाटबंधारे विभागामार्फत काढण्यात आली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून व्यवसाय करणे कंत्राटदार कृत्रिम निविदा एकत्रिकरणामुळे स्पर्धात्मक निविदामध्ये भाग घेण्यास अपात्र ठरत आहे. परिणामी, स्थानिक कंत्राटदार रोजगारापासून वंचित राहत आहेत. पंजिकृत कंत्राटदारांना आर्थिक संकट व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एकत्रित निविदा न काढता वेगवेगळी काढण्यात यावी, अशी मागणी आहे.
हिंगणी ते हमदापूरपर्यंत जवढपास १५० किमीच्या वितरिकांची दुरुस्तीचा प्रस्ताव आहे. कोणताही एक ठेकेदार हे काम ठरलेल्या वेळेत पुर्ण करू शकत नाही. त्यामुळे या दोन्ही कामांच्या निविदा वेगवेगळ्या काढण्यात याव्या अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय एकच निविदा काढल्यास त्यात छोटे ठेकेदार भाग घेऊ शकत नाहीत. वेगवेगळ्या कामाच्या निविदा काढल्या तर अनेक बेरोजगांच्या हाताला काम मिळेल असे महाराष्ट्र इंजिनिअरर्स संघटनेच्या वतीने कळवण्यात आले आहे.