समुद्रपूर,
Tiger attack : तालुक्यातील गिरड, खुर्सापार परीसरात मुकामी असलेल्या वाघ, वाघीण व तिच्या तीन पिल्लं हे वाघाचे कुटुंब पाळीव जनावरांच्या शिकारीच्या मागे लागले असुन रोज एका मागून एक शिकार करीत आहेत. खैरगाव येथे गावाशेजारील असलेल्या शेतात बांधून असलेल्या यज्ञपाल छौयले यांच्या तीन गाई, एका गोर्यावर हल्ला चढवत जागीच ठार केले. ही घटना आज शनिवार १३ रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली.

प्राप्त माहितीनुसार खैरगाव येथील यज्ञपाल छौयले यांनी शुक्रवारी रात्री जनावरांचे चारा पाणी करून शेतातील झाडाखाली बांधून ठेवले होते. सकाळी जनावरे सोडण्यासाठी गेले असता ४ जनावरे मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वनपरिश्रेत्र अधिकारी नीलेश गावंडे यांनी वनरक्षक समीर वाघ यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर वन विभागाकडून नजर ठेवण्यात येते असुन वनविभाग अलर्ट मोडवर असले तरी मात्र या पाचही वाघांनी शिकारीचा सपाट सुरू केला आहे. या वाघाच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहे. वाघांचा शेत शिवारात वाढता वावर लक्ष घेऊन शेतकरी शेतमजूर यांनी खबरदारी बाळगावी, रात्री कोणीही शेतामध्ये जनावरे बांधून ठेवू नये असे आवाहन केले आहे.