कातडी काढलेल्या बिबट्याच्या मृतदेह जाळला; नखं फेकली नाल्यात

14 Dec 2025 20:52:30
वर्धा,
leopard : बिबट्याच्या कातडीच्या तस्करी प्रकरणातील आरोपींनी वनकोठडीदरम्यान धक्कादायक खुलासा केल्याने वनविभागातही खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपींनी मृत बिबट्याची कातडी व नख काढल्यावर बिबट्याचा मृतदेहाची जाळून विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे.
 
 
fgd
 
बिबट्याची कातडी कोट्यवधी रुपयांमध्ये विकण्याच्या बेतात असलेल्या शालिनी पवार, अनिस तुमडाम आणि सौरभ रंदई यांना प्रादेशिक वनविभागाच्या चमूने सुरूवातीला ताब्यात घेत अटक केली. नंतर आणखी तिघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली. अनिस तुमडाम, शालिनी पवार (कौरती), सौरभ रंदई, शुभम गुणवंत थोटे, स्वप्नील गुणवंत थोटे आणि नामदेव सीताराम मसराम यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. असे असले तरी वन कोठडीदरम्यान वनविभागाच्या अधिकार्‍यांनी आरोपींची कसून चौकशी करीत गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिकची माहिती जाणून घेतली. रविवार ३० रोजी हिंगणा परिसरात शेताला लावलेल्या तारेच्या कुंपनात वीज प्रवाहीत करण्यात आली. याच विद्युत प्रवाहीत तारेचा स्पर्श झाल्याने बिबट्या ठार झाल्याचे सोमवार १ डिसेंबरला पहाटे कळले. त्यानंतर आरोपींनी या घटनेची कुणालाही माहिती न होऊ देता शेळीची कातडी काढणार्‍यांची मदत घेत मृत बिबट्याचे नख व कातडी वेगळी केली. त्यानंतर बिबट्याचा मृतदेह जाळत त्याची विल्हेवाट लावली. तर बिबट्याचे नख हिंगणा परिसरातीलच नाल्यात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी संबंधित गुन्ह्याचा तपास करणार्‍या अधिकार्‍याला दिली असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
 
 
पुढील तपास उपवनसंरक्षक हरविरसिंग यांच्या मार्गदर्शनात हिंगणी (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकारी मीनल तुरखडे, क्षेत्र सहायक डी़. ए़. उईक, वनरक्षक एस़. डी़. दांडगे करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0