संत्रा रोपवाटिका सक्षम करण्यासाठी अध्यादेश काढणार

14 Dec 2025 21:09:39
नागपूर,
dattatray-bharne : संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना उत्तम व दर्जेदार रोपे मिळावी नर्सरी अर्थात रोपवाटिका सक्षम व्हाव्यात या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात विदर्भातील शेतकरी तसेच अ‍ॅग्रोव्हिजन समितीकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करून सर्वसमावेशक असा संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना बळ देणारा नर्सरी कायदा अस्तित्वात यावा यादृष्टीने सकारात्मक निर्णय घेऊन लवकरच या संबंधित अध्यादेश काढण्याच्या सूचना राज्याचे कृषिमंत्री भरणे यांनी दिल्या.
 

ngp 
अ‍ॅग्रोव्हिजनची संत्रा नर्सरी धोरण समिती
 
 
नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत अ‍ॅग्रोव्हिजनची संत्रा नर्सरी धोरण समिती, राज्याचा कृषी व फालोत्पादन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एनआरसीसी यांची संयुक्त बैठक रविवारी झाली. बैठकीला राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषी राज्यमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल, अतिरिक्त सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त पाटील, डॉ. शरद गडाख, एनआरसीसीचे डॉ. दास, डॉ. सी. डी. मायी, आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार उमेश यावलकर, श्रीधर ठाकरे, रवींद्र बोरटकर, मोरेश्ववर वानखेडे, सुधीर दिवे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
 
शेतकर्‍यांना फळांची दर्जेदार रोपे मिळावी
 
 
या बैठकीत सुरुवातीला बोलताना नितीन गडकरी म्हणाले, ’महाराष्ट्रात रोपमळे (नियमन) अधिनियमन या अन्वये शेतकर्‍यांना फळांची निरोगी रोपे आणि दर्जेदार वाढणारी रोपे मिळावी हा उद्देश आहे. फळबागांमध्ये प्राथमिक रोपाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण फळबाग वाढीस चार-पाच वर्ष लागतात आणि जर चांगली रोपे त्यांना मिळाली नाही तर शेतकर्‍याचे अत्यंत नुकसान होते. अतिशय गंभीर बाब असून संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्न या प्रश्नांशी जोडला गेलेला आहे.
 
संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना मिळणार रोपे
 
 
या सर्व सूचनांचा विचार करून व राज्य शासनाचा कृषी विभाग आणि पीकेव्हीच्या माध्यमातून दर्जेदार रोपवाटिका व रोपमळे यासंदर्भात डॉ. शशांक भराड, डॉ. पंचभाई आणि सहसंचालक कृषी यांच्याकडून यावेळी मंत्र्यांसमोर सादरीकरण करण्यात आले. या सर्व सादरीकरणानंतर विस्तृत चर्चा झाली केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सूचनेप्रमाणे संत्रा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्टीने तसेच उत्तम नर्सरी नियोजनाच्या पुढील अध्यादेश काढण्याच्या सूचना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीच्या शेवटी अधिकार्‍यांना दिल्या.
Powered By Sangraha 9.0