मुंबई,
Devendra Fadnavis राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. मतदान १५ जानेवारी रोजी होणार असून, निकालाची घोषणा १६ जानेवारी रोजी केली जाईल. या निर्णयासह राज्यात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना गती मिळणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केल्यामुळे आता राजकीय पक्ष युती-आघाडी संदर्भातील चर्चांना अधिक वेग येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आपल्या सरकारच्या कामगिरीवर भर देत, निवडणुकीत आमचा कौल जनता आमच्या बाजूने येईल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. फडणवीस म्हणाले, “राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याचा मला आनंद आहे. या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या भरवशावर चालणं लोकशाहीला अभिप्रेत नव्हतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे या संस्था दीर्घकाळ निर्वाचित प्रतिनिधींसिवाय होत्या. आता पुन्हा निवडणुका होणार आहेत. आमच्या शासनाने केलेलं काम पाहता कौल आमच्या बाजूने येईल, आणि जनता आम्हाला पुन्हा शहर विकासाची संधी देईल, असा विश्वास आहे.”
राजकीय युतींबाबतही Devendra Fadnavis फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, “आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करत आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी भाजपा आणि शिवसेनेची युती होईल. काही ठिकाणी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी युती होईल, तर काही ठिकाणी भाजपा-राष्ट्रवादीची युती होतानाही दिसेल. पुण्यात मात्र अजित पवारांशी आमची चर्चा झाली आहे. आम्ही दोघे इथले मोठे पक्ष आहोत. भाजपाने पाच वर्षं पुण्याचा चांगला विकास केला आहे. त्यामुळे कदाचित पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा समोरासमोर लढताना दिसेल. असं असलं तरी ही मैत्रीपूर्ण लढत असेल, कोणतीही कटुता नसेल.”
राज्यातील महापालिका निवडणुकीत राजकीय पक्षांची रणनीती, युती-आघाडीचे समीकरण आणि स्थानिक पातळीवरील प्रचार-प्रसार यावर लक्ष केंद्रित होत असून, नागरिकांना आपल्या शहराच्या विकासासाठी कोणत्या पक्षाला संधी द्यावी, हा प्रश्न मोठा ठरणार आहे.