सिओल,
Arjuna Ranatunga is in trouble श्रीलंकेतील सुमारे २३५ दशलक्ष रुपयांच्या तेल घोटाळ्याप्रकरणी देशाचा माजी क्रिकेट कर्णधार आणि माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांच्या अटकेची तयारी सुरू असल्याची माहिती सोमवारी न्यायालयात देण्यात आली. पेट्रोलियम मंत्री असताना झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून ही कारवाई करण्यात येणार असून, भ्रष्टाचारविरोधी संस्थेने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
भ्रष्टाचारावर नजर ठेवणाऱ्या संस्थेनुसार, अर्जुन रणतुंगा आणि त्यांचे भाऊ यांनी दीर्घकालीन तेल खरेदी करारांमध्ये बदल करून जास्त दराने तातडीच्या म्हणजेच स्पॉट खरेदीचे व्यवहार केल्याचा आरोप आहे. या व्यवहारांमुळे सरकारी तिजोरीला मोठा आर्थिक फटका बसल्याचे तपासात समोर आले आहे. लाचखोरी आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या आयोगाने सांगितले की, २०१७ साली करण्यात आलेल्या या करारांमुळे राज्याचे एकूण सुमारे ८०० दशलक्ष श्रीलंकन रुपयांचे नुकसान झाले असून, त्या वेळी ही रक्कम सुमारे ५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक होती.
आयोगाने कोलंबो येथील मॅजिस्ट्रेट असांगा बोडारागामा यांना माहिती दिली की अर्जुन रणतुंगा सध्या परदेशात असून, श्रीलंकेत परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणात अर्जुन यांचे मोठे भाऊ धम्मिका रणतुंगा, जे त्या काळात सरकारी मालकीच्या सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष होते, यांना सोमवारी अटक करण्यात आली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना देशाबाहेर जाण्यास मनाई केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ मार्च रोजी होणार आहे.
६२ वर्षीय अर्जुन रणतुंगा हे श्रीलंकेच्या क्रिकेट इतिहासातील एक महत्त्वाचे नाव असून, त्यांच्या नेतृत्वाखाली १९९६ च्या क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता. रणतुंगा बंधूंविरोधातील ही कारवाई राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांच्या सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा भाग असून, हे सरकार गेल्या वर्षी व्यापक भ्रष्टाचार रोखण्याच्या आश्वासनावर सत्तेत आले आहे. दरम्यान, रणतुंगा कुटुंबातील आणखी एक भाऊ आणि माजी पर्यटन मंत्री प्रसन्ना रणतुंगा यांना गेल्या महिन्यात विमा फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. याआधी जून २०२२ मध्ये एका व्यावसायिकाकडून पैसे उकळल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आले असून, त्यांना दोन वर्षांच्या निलंबित कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.