हरियाणाच्या नकाशात बदल...२३ वा जिल्ह्या झाला हांसी!

16 Dec 2025 14:55:26
हरियाणा,
Hansi district in Haryana हरियाणात २३ वा जिल्हा निर्माण करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मंगळवारी हांसी शहराला नवीन जिल्हा म्हणून स्थापन करण्याची घोषणा केली. हांसीत झालेल्या सभेत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की जिल्ह्याच्या अधिकृत दर्जासाठी सात दिवसांत अधिसूचना जारी केली जाईल. हांसीच्या जिल्ह्याच्या मागणीचा इतिहास जुना आहे. हे शहर शतकानुशतके ऐतिहासिक महत्त्वाचे असून, भारताच्या स्वातंत्र्यानंतर अद्याप जिल्हा म्हणून मान्यता मिळालेली नव्हती. हांसीचा बादसी दरवाजा शहराच्या इतिहासाचे आणि वारशाचे प्रतीक मानले जाते. स्थानिक नागरिक अनेक वर्षांपासून जिल्हा स्थापन करण्याची मागणी करत आहेत.
 
 
hansi
 
हरियाणा पंजाबमधून वेगळे झाल्यानंतर राज्यात सात जिल्हे स्थापन करण्यात आले होते. त्यात गुरुग्राम, महेंद्रगड, रोहतक, कर्नाल, अंबाला, जिंद आणि हिसार यांचा समावेश होता. पुढील काही वर्षांत, तत्कालीन मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल, चौधरी भजन लाल, चौधरी देवी लाल, भूपिंदर सिंग हुड्डा आणि मनोहर लाल यांनी वेगवेगळ्या काळात अनेक नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली. यापूर्वीच्या निर्मितीमध्ये भिवानी, सोनीपत, कुरुक्षेत्र, सिरसा, फरीदाबाद, रेवाडी, पानीपत, यमुनानगर, कैथल, पंचकुला, झज्जर, फतेहाबाद, नूह आणि पलवल यांचा समावेश होता.
अलीकडे, हरियाणाचा २२ वा जिल्हा, चरखी दादरी, ४ डिसेंबर २०१६ रोजी स्थापन केला गेला होता. आता विद्यमान मुख्यमंत्री नायब सैनी यांनी हांसीला २३ वा जिल्हा म्हणून जाहीर करून राज्याच्या प्रशासकीय नकाशात नवीन बदल केला आहे. या निर्णयामुळे हांसीच्या नागरिकांना प्रशासनिक सुविधा आणि स्थानिक विकासासाठी मोठा फायदा होईल.
Powered By Sangraha 9.0